Sun, May 19, 2019 14:15
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › ‘महावितरण’ची माहिती हवी...जावा बारामतीला

‘महावितरण’ची माहिती हवी...जावा बारामतीला

Published On: Jun 30 2018 1:20AM | Last Updated: Jun 29 2018 10:39PMसातारा : विशाल गुजर

जिल्ह्यात महावितरणचा सर्वत्र भोंगळ कारभार सुरू आहे. 2013 सालापासून शेतकर्‍यांची जिल्ह्यातील 16330 कृषी पंपाची प्रकरणे प्रलंबित असल्याने शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान वीज वितरणच्या कामाची माहिती पाहिजे असेल तर अधिकारी बारामती कार्यालयाला विचारा असे सांगत आपली जबाबदारी टाळत आहेत.

जिल्ह्यातील शेतकरी विविध समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. अनेक शेतकर्‍यांनी बोअरवेल काढल्या असून विहिरींही खणल्या आहेत. कोरडवाहू क्षेत्र बागायत होईल, यासाठी बोअरवेल विहिरींसाठी कर्जे काढली आहेत. मात्र, महावितरणकडून कृषी पंपांना कनेक्शन दिली जात नसल्याने शेतकर्‍यांवर मोकळ्या विहीर किंवा बोअरवेलकडे बघत बसण्याची वेळ आली आहे. डीपी मंजूर असूनही ती लवकर दिली जात नाही. बर्‍याच ठिकाणी नव्या डीपीची मागणी असूनही मंजूर केल्या जात नाहीत. त्यामुळे एकाच डीपीवर अतिरिक्त भार येत असल्याने डीपी जळण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यांच्या दुरुस्ती बाबतही महावितरणकडून तत्परता दाखवली जात नाही.

ग्रामीण भागासह शहरांमध्येही विजेचा लपंडाव सुरू आहे. विजेच्या कमी दाबामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पावसासह वादळाचे कारण पुढे करत वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात आहे. अखंड वीजपुरवठा देण्याची घोषणा 2015 साली मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. मात्र, असे असताना जिल्ह्याला कृत्रिम लोडशेडिंगच्या खाईत लाटले जात आहे. शेतकर्‍यांना महावितरणच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. शेतकर्‍यांसंदर्भात महावितरण कोणत्याच उपाययोजना करत नसल्याचे त्याबाबत अधिकारी बारामतीच्या कार्यालयाकडे बोट दाखवत आहेत.

समस्या असतील तर चर्चा करू पण कारभारासंदर्भात बारामती कार्यालयातूनच माहिती मिळेल, अशी भूमिका अधिकारी घेत आहेत. शेतकर्‍यांच्या प्रलंबित कामाची माहिती देण्यास विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे. शेतकर्‍यांची कामे तत्परतेने मार्गी लावण्याऐवजी प्रलंबित ठेवण्याकडेच अधिकार्‍यांची मानसिकता असल्याचे एकूण परिस्थितीवरून लक्षात येते.