होमपेज › Satara › भीमा-कोरेगाव प्रकरण : कराडात कडकडीत बंद(व्हिडिओ) 

भीमा-कोरेगाव प्रकरण : कराडात कडकडीत बंद(व्हिडिओ) 

Published On: Jan 03 2018 10:45AM | Last Updated: Jan 03 2018 10:45AM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव (पुणे) येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होत कराडकरांनी कडकडीत बंद पाळला. एसटी, खासगी प्रवासी वाहतूक तसेच शहरांतर्गत सुरू असणारी रिक्षा वाहतूक बुधवारी पूर्णपणे ठप्प झाली होती. तसेच शहरातील सर्व दुकाने बंद होती. त्यामुळेच विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांचे मोठे हाल झाले.

महाराष्ट्र बंदमुळे बुधवारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कराड आगारातील सर्व एसटी बस बंद ठेवण्यात आल्‍या होत्या.  त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व चाकरमानी बसस्थानक परिसरात हतबलपणे उभे राहिल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कॉटेज हॉस्पिटल परिसर, कृष्णा नाका, कराड बसस्थानक परिसर, दत्त चौक, चावडी चौक कन्याशाळा, मुख्य पोस्ट ऑफीस परिसरातही मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी दहापर्यंत कुठेही अनुचित प्रकार घडला नव्हता. तसेच पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी शहरात गस्त घालताना दिसत होते. 

दरम्यान, भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री कराडमधील शासकीय विश्रामगृहात शांतता समितीची बैठक झाली होती. आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील, प्रांताधिकारी हिंमतराव खराडे, पोलिस उपाधीक्षक नवनाथ ढवळे, तहसीलदार राजेंद्र शेळके नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, बांधकाम सभापती हणमंतराव पवार यांच्यासह सर्व नगरसेवक, विविध संघटना, पक्षाचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली होती.  तसेच  तसेच बुधवारी बंद दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून प्रशासनाला सहकार्य करू, अशी ग्वाही नागरिकांनी दिली होती. त्यामुळेच बंद वेळी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, असा विश्‍वास प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.