Mon, Jun 24, 2019 16:49होमपेज › Satara › महाराष्ट्र देशातील पहिले पुस्तकाचे राज्य व्हावे

महाराष्ट्र देशातील पहिले पुस्तकाचे राज्य व्हावे

Published On: May 05 2018 12:52AM | Last Updated: May 04 2018 10:58PMभिलार : वार्ताहर

पर्यटन आणि संस्कृती यांचा सुंदर मिलाप झाला तर त्याचे फलित काय असते हयाचे उत्तम उदाहरण भिलारने दाखवले आहे. यातून प्रेरणा घेऊन राज्यातील प्रत्येक गाव पुस्तकाचे गाव निर्माण व्हायला हवे. यामुळे एक दिवस पुस्तकाचे राज्य म्हणून महाराष्ट्राची किर्ती देशभर होईल, असे प्रतिपादन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केलेपुस्तकांचं गाव (भिलार) या अभिनव प्रकल्पास 1 वर्ष पूर्ण झाले. या वर्षपूर्ती निमित्ताने ‘शब्द चांदणे’ हा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच खुल्या प्रेक्षागृहाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ना. देसाई बोलत होते.यावेळी मराठी भाषा मंत्री ना. विनोद तावडे, भूषण गगराणी, बाळासाहेब भिलारे, सभापती रूपाली राजपुरे, सरपंच वंदना भिलारे, उपसरपंच अनिल भिलारे, राजेंद्र राजपुरे, राजेंद्र भिलारे व मान्यवर उपस्थित होते.

ना. देसाई म्हणाले, तावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेले आणि भिलार ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नातून उभे राहिलेले हे पुस्तकांचे गाव खर्‍या अर्थाने समृद्ध झाले आहे. घरातील दालनात विषयांप्रमाणे पुस्तकांची विभागणी करून ज्ञानाचे समृद्ध भांडार येथे निर्माण केले आहे. येथे पर्यटनाबरोबरच आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. पर्यटन विकासासाठी आणि भाषा संवर्धनासाठी पाहिजे ती मदत देण्यासाठी मी प्रयत्नशील राहिन.

ना. तावडे म्हणाले, पुस्तकाचे गाव निर्माण होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे अनेक साहित्यिक, गायक आणि हजारो वाचकांनी या ठिकाणी भेट दिल्याचे समाधान वाटते. या विभागाला स्वतंत्र बजेट नसले तरी उद्योग खाते व पर्यटन विभागाच्या सहकार्याने हे खुले प्रेक्षागृह साकारले आहे. वर्षभरात अनेक दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन केले. यापुढेही असे कार्यक्रम मराठी भाषा विभागा मार्फत आयोजित करण्यात येतील. रस्ता, रुंदीकरण, पार्किंग यासारख्या भेडसावणार्‍या अनेक समस्या आहेत त्याकरता संबधित विभागाच्या बैठका घेऊन सोडवण्यात येतील. बाळासाहेब भिलारे यांनी प्रास्ताविक केले. आनंद काटीकर यांनी सूत्रसंचलन केले. विनय  मावळणकर यांनी आभार मानले. 

Tags : Satara, Maharashtra, first, state, country,  book, list