Thu, Nov 22, 2018 00:23



होमपेज › Satara › कडव्याचे अखंड पाषाणातील महादेव मंदिर

कडव्याचे अखंड पाषाणातील महादेव मंदिर

Published On: Aug 27 2018 1:18AM | Last Updated: Aug 26 2018 8:54PM



तारळे ः एकनाथ माळी 

तारळेजवळच कडवे बु॥ गाव असून निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावामध्ये ग्रामदेवतांची मंदिरे आहेत. येथे अखंड पाषाणात कोरलेले महादेव मंदिर आहे. गाभार्‍यासह दोन ठिकाणी स्वयंभू पिंड असून पांडवांनी एका रात्रीत मंदिर बांधल्याची आख्यायिका सांगितली जाते. 

गावाजवळून वाहणार्‍या ओढ्याच्या तीरावर अखंड पाषाणात मंदिर कोरण्यात आले आहे. मंदिराच्या सभामंडपात दोन तर मंदिराच्या पुर्व व पश्‍चिमेला दोन अशी चार ठिकाणी पाषाणात कोरलेल्या खोल्या असून यात अनेक देवदेवतांच्या पाषाणाच्या मुर्ती आहेत. काळाच्या ओघात मंदिरासह मुर्तिंची दुरावस्था होत आहे. वेळोवेळी ग्रामस्थांकडून मंदिराची डागडूजी केली जात असून पुरातत्व विभागाने मंदिराचा अभ्यास करण्याची मागणी करण्यात येत आहे.

एका अखंड पाषाणात कोरलेल्या मंदिरात सभामंडपात दगडी खांब उभे असून गाभार्‍यात स्वयंभू पिंड आहे.सभामंडपाच्या पूर्वेला सुर्यदेवतेची तर पश्‍चिमेला विष्णूची पाषाणाच्या मुर्तिंची दोन मंदिरे आहेत. विष्णूच्या मुर्तिवर सुर्यकिरण पडण्यासाठी मंदिरावर होल ठेवण्यात आला आहे. 

मंदिराच्या पुर्वेला असलेल्या पाषाणाच्या बारमाही पाणी असलेल्या कोरीव मंदिरात विष्णूची मुर्ती असून त्याभोवती विष्णूच्या चौदा अवतारातील मुर्ती आहेत. तर मंदिराच्या पश्‍चिमेला स्वयभू पिंड आहे. त्याठिकाणी पूर्वी चिठ्ठी ठेवली तर भांडी निघत होती, अशी आख्यायिका सांगितली जाते. मंदिराच्या पाठीमागे दगडातच विहीर होती, ती आता मुजून गेली आहे.

उत्तर व पश्‍चिमेच्या कोपर्‍यात भुयार आहे. ते मातीने भरले आहे.सुमारे पंधरा वर्षापुर्वी गावातील काही युवकांनी त्या कोपर्‍यातील माती काढून बघितली असता खाली पायर्‍या भुयारात उतरु लागल्या नंतर तो प्रयत्न सोडून देण्यात आला. तेथेही एखादे मंदिर असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तारळे विभागात अनेक मंदिरे ऐतिहासिक व पौराणिक पाऊल खूणा दाखवत असून कडवे बु॥ (ता.पाटण) येथील पांडवकालीन महादेव मंदिर  आजही पर्यटनाच्या दृष्टीने व पुरातत्व विभागापासून दूर राहीले आहे. त्यामूळे पुरातत्व खात्याने मंदिराचा सखोल अभ्यास करण्याची मागणी करण्यात येत आहे.