Tue, Jul 23, 2019 04:15होमपेज › Satara › म’श्‍वरमध्ये दरोडा; ५ लाखांची रोकड लंपास

म’श्‍वरमध्ये दरोडा; ५ लाखांची रोकड लंपास

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 14 2018 10:32PMमहाबळेश्‍वर : वार्ताहर 

महाबळेश्‍वर येथील भरवस्तीतील तीन पतसंस्था चोरट्यांनी शुक्रवारी रात्री फोडल्या. 5 लाखांची रोकड लंपास झाली असून या घटनेने नागरिकांत घबराट पसरली आहे. पोलिसांसमोर या घटनेने तपासाचे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, या घटनेतील दोघे चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत.  

येथील पोलिस वसाहतीच्या बाजूला पालिकेचे महात्मा फुले मार्केट व्यापारी संकुल आहे. येथे साई नागरी, श्री गोटेनिरा जन्नीमाता बिगर शेती व  जनता नागरी सह पतसंस्था आहेत. शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी या संकुलातील तीन पतसंस्थांपैकी दोन पतसंस्थांचे शटर उचकटून 5 लाख, 20 हजार, 589 रुपयांची रोकड लंपास केली आहे. 

साई नागरी सहकारी पतसंस्थेतील कपाटे फोडून दस्ताऐवज अस्ताव्यस्त टाकले होते. येथील एका कपाटाच्या कप्प्यात असलेली चिल्लर व चांदीचा एक शिक्का चोरट्यांच्या हाताला लागला नाही. पतसंस्थेतून बाहेर पडण्याच्या गडबडीत त्यांच्या हातातील बॅटरी घटनास्थळी पडली आहे. या पतसंस्थेला लागून असणार्‍या श्री गोटेनिरा जन्नीमाता बिगर शेती सह. पतसंस्थेचेही टाळे तोडून कपाटातील 1 लाख 85 हजार 249 रूपये लांबवले. तसेच सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. या दोन पतसंस्थांच्या मागील बाजूस असणार्‍या जनता नागरी सह. पतसंस्थेचे शटर कटावणीच्या सहाय्याने उचकटण्याचा प्रयत्न केला. तसेच कुलूप हॅक्सा ब्लेडने कापून संस्थेत प्रवेश केला. येथील एका ड्रॉवरमधील असणारी 3 लाख 35 हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लांबवली.

या व्यापारी संकुलावरील मजल्यावर  हायस्कूल आहे. शनिवारी हे हायस्कूल सकाळी भरत असल्याने कर्मचारी आल्यानंतरही घटना घडल्याचे समजले. हायस्कूलच्या कर्मचार्‍यांनी  पतसंस्थांच्या लोकांना याबाबत माहिती दिली. पतसंस्थेचे पदाधिकारी तत्काळ घटनास्थळी आले. तसेच पोलिस उपनिरीक्षक बालाजी गायकवाड यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, श्‍वान पथकास पाचारण करण्यात आले होते. जनता नागरी पतसंस्थेचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरु होते. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले असून यामध्ये दोन चोरटे दिसून आले आहेत. चोरट्यांनी पावसाळी रेनकोट परिधान केले असून तोंडाला माकडटोपी घातली आहे. एका चोरट्याच्या हातात मोठा हॅक्सा ब्लेड, लोखंडी कटावणी व एक रक्कम भरून घेऊन जाण्यासाठी पिशवी असल्याचे दिसून आले. 

पोलिसांनी पतसंस्थेच्या सीसीटीव्ही फुटेजबरोबरच छ.शिवाजी चौक व माखरिया हायस्कूल यांच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेजही घेतले आहेत. शनिवारी सकाळी सातारा येथील हस्तरेषा तज्ज्ञ एपीआय अनिल कोळी हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हातांच्या ठशांच्या नोंदी घेतल्या आहेत. चोरट्यांनी वापरलेले एक हॅक्सा ब्लेड व बॅटरी यावरीलही ठसे घेण्यात आले आहेत.  या घटनेची महाबळेश्‍वर पोलिस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बालाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक काशीद व श्रीकांत कांबळे करत आहेत.