Thu, Jul 18, 2019 08:31होमपेज › Satara › क्षेत्र महाबळेश्वर येथील महादेव मंदिर(Video)

क्षेत्र महाबळेश्वर येथील महादेव मंदिर(Video)

Published On: Sep 08 2018 1:33AM | Last Updated: Sep 07 2018 7:39PMमहाबळेश्वर : वार्ताहर

एक थंड हवेचे पर्यटनस्‍थळ म्‍हणुन महाबळेश्वर हे प्रसिध्द आहे. यासोबतच पवित्र तीर्थक्षेत्र व धार्मिक स्थळांसाठीही महाबळेश्वर प्रसिध्द आहे. महाबळेश्वर पासून 6 किमी अंतरावर अद्वितीय निसर्गसौंदर्याचे देणे लाभलेला परिसर म्हणजे श्री क्षेत्र महाबळेश्वर होय. 

श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे असलेल्या पंचगंगा मंदिरालाही ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. सुमारे सहाशे वर्ष जुने असलेल्‍या पंचगंगा मंदिरात पाच नद्यांचे उगमस्थान असून, या मंदिरातून कृष्णा कोयना, सावित्री, गायत्री व वेण्णा या नद्यांचा उगम झाला आहे. पुरातन कथेनुसार ब्रह्म, विष्णू, महेश, सावित्री व गायत्री या देवतांचा येथून जलरूपात उगम झाला आहे, असे म्हंटले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्‍येक सोमवारी तसेच महाशिवरात्री दिवशी या मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविकांची क्षेत्र महाबळेश्वरला गर्दी होत असते.

महाबळेश्वरला पर्यटनासाठी येणारे लोक श्री महाबळेश्वनर, श्री पंचगंगा देवालयाला आवर्जुन भेट देतात. येथील श्री कृष्णामाईचे देवालय म्हणजे कृष्णानदीचे उगमस्थान आहे. कृष्णा नदीचा उगम येथे झालेला असुन, ती महाराष्ट्, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वहाते. महाबळेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात शंकराच्या पिंडीच्या मस्तकावर पाच नद्यांचे वास्तव्य आहे. त्या प्रवाही नाहीत व तेथूनच गुप्त होतात व नंतर महाबळेश्वर मधील पुराणकालीन महादेव मंदिराच्या जवळील गोमुखातून उगम पावतात अशी कथा आहे.

एका दंतकथेनुसार सावित्रीने विष्‍णुला शाप दिला यामुळे विष्‍णुची कृष्‍णा झाली. या नदीच्या वेण्णा आणि कोयना या उपनद्यांना शिव आणि ब्रम्हा स्‍वरूप म्‍हणुन मानले मानले जाते. येथून बाहेर पडल्यानंतर कृष्णा नदी स्वतंत्र वहाते. येथील एका कड्यावर प्राचीन हेमांडपंथी शिवमंदिर आहे. त्यात ठेवलेल्या कृष्णेच्या मुर्तीमुळे त्याला कृष्णाबाई मंदिर असेही म्हणतात. हे मंदिर दगडात बांधण्यात आले असून, छतही दगडात बांधण्यात आले आहे. गर्भगृहात भव्य शिवलिंग आहे. त्याच्या खालून पाण्याची सतत धार चालू असते. येथूनच कृष्णेचा उगम झाला आहे. गर्भगृहासमोर एक कुंड आहे. त्या कुंडात गोमुखातून अखंडितपणे पाण्याची धार वाहत असते. तीच पुढे नदीरूपाने वाहत जाते.