Sun, Mar 24, 2019 04:11होमपेज › Satara › म’श्‍वर तालुक्यात विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

म’श्‍वर तालुक्यात विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 17 2018 8:41PMमहाबळेश्‍वर : वार्ताहर 

महाबळेश्‍वर तालुक्यातील महावितरणच्या गलथान कारभाराने तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या दुर्गम डोंगराळ भागातील अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वीजच ‘गायब’ झाली आहे. तर मुख्य शहरातील नागरिक विजेच्या लपंडावाला वैतागले आहेत. महावितरणच्या अनागोंदी कारभार सुरु असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

महाबळेश्‍वरच्या निसर्गरम्य पर्यटननगरीत गेल्या दोन वर्षांपासून महावितरणचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. वारंवार आवाज उठवून देखील कारभारात सुधारणा होत नसून पहिले पाढे पंचाव्वान अशीच अवस्था झाली आहे. उन्हाळी हंगामामध्ये अनेकवेळा वीज गुल झाल्याने स्थानिकांसह येथे पर्यटनास आलेल्या पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. याचा परिणाम येथील व्यवसायावर झाला. मात्र आता पावसाळी हंगामामध्येही वीज गुल होत असल्याने पर्यटकांना नाहक त्रास होत आहे. महाबळेश्‍वर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वीजच गुल झाली आहे. तर शहरात देखील परिस्थिती वेगळी नसून वारंवार खंडित होणार्‍या वीज पुरवठ्यामुळे स्थानिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.गेल्या सहा महिन्यांपासून खंडित होणार्‍या वीज पुरवठ्याबाबत कोणतीही परिणामकारक उपाययोजना महावितरणकडून करण्यात आली नाही. 

उन्हाळी हंगामामध्ये जनतेस जो त्रास सहन करावा लागला तो पावसाळी हंगामामध्ये देखील सहन करावा लागत आहे. बुधवारी दिवसभर लाईटचा खेळखंडोबा सुरूच होता. गुरुवारी दिवसभर लाईटचा पत्ताच न्हवता. सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे बाजारपेठेसह परिसरातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक हैराण झाले आहेत. पावसाळी हंगामामध्ये ‘वीकेंड’ला येणार्‍या पर्यटकांची गैरसोय होत असल्यामुळे याचा फटका सर्वानाच बसत आहे. अपुरी कर्मचारी संख्या, अधिकार्‍यांचे दुर्लक्ष, अनागोंदी कारभार, कामाबद्दल अनास्था असल्याने महाबळेश्‍वरचे हे महावितरण कायमच चर्चेचा विषयी बनले आहे. सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. तर वाढीव येणार्‍या वीज बिलांमुळे तालुक्यातील नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.