Fri, Jul 19, 2019 07:04होमपेज › Satara › महाबळेश्‍वर धुक्यात हरवले; पर्यटक पावसात चिंब

महाबळेश्‍वर धुक्यात हरवले; पर्यटक पावसात चिंब

Published On: Jun 18 2018 1:12AM | Last Updated: Jun 17 2018 11:19PMमहाबळेश्‍वर : वार्ताहर

पर्यटकांच्या हक्काचे ‘डेस्टिनेशन’ असलेल्या थंड हवेच्या महाबळेश्वरला सध्या वातावरणातील बदलामुळे वेगळेच स्वरूप प्राप्त झाले आहे. वातावरणातील या बदलाने शहरासह सर्वच प्रेक्षणीय स्थळांवर दाट धुक्याची चादर पसरली असून हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. अधूनमधून हलका तर कधी धो-धो बरसणार्‍या पाऊस अशा सुखावणार्‍या थंडीत व दाट धुक्यामुळे पर्यटनास आलेले पर्यटक सुखावले आहेत. 

महाराष्ट्राचे नंदनवन असलेले थंड हवेच्या महाबळेश्वरचा उन्हाळी हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून पर्यटकांची गर्दी अजूनही आहे.गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरातील वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. सायंकाळ नंतर दाट धुके पसरत असून हवेत सुखावह गारवा जाणवत आहे. पर्यटक या बदलणार्‍या वातावरणाचा अनुभव घेत आहेत.

येथील सर्वात उंच असणार्‍या व सुर्योदयासाठी प्रसिद्ध असलेल्या विल्सन पॉईन्ट वर वार्‍याबरोबर वाहणार्‍या ढगांसारखे धुक्याचे लोट पाहून पर्यटक भारावून जात आहेत. ऑर्थर सीट, केट्स पॉईंट, लॉडविक पॉईंट, कॅनॉटपीक पॉईंट या प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटक गर्दी करीत आहेत. दाट धुक्यात देखील पर्यटकांना ’सेल्फी’ घेण्याचा मोह आवरता येत नाही.

येथील वेण्णालेकवर देखील दाट धुके व अंगाला सुखावणारा गारव्याचा अनुभव घेत पर्यटक आल्हाददायक व रम्य वातावरणात नौकाविहाराचा आनंद लुटत आहेत. तसेच घेडेसवारी, गरमागरम मका कणीस, पॅटिस, वडापाव, भजीसह चहाचा आस्वाद पर्यटक आहेत. येथील प्रसिद्ध स्ट्रॉबेरी विथ क्रीमवर देखील पर्यटक ताव मारत आहेत. 

महाबळेश्वरचे हे वेगळे रूप पाहून ’काश्मीर’ ला आल्याचा ’फील’च जणू पर्यटकांना येत आहे. मुख्य बाजारपेठेत ही दाट धुके पसरल्याने खरेदीसाठी आलेले पर्यटक बदललेल्या वातावरणाचा आनंद लुटत आहेत. तसेच थंड वातावरणात उबदार कपडे खरेदी करीत आहेत. शहरातील रेस्टोरंट मधील लज्जतदार पदार्थांची चव चाखताना देखील पर्यटक पाहावयास मिळत आहेत. पावसाळा सुरु हाऊन देखील राज्यात कडक उन्हाळा जाणवत असल्याने परिसरातून पर्यटक महाबळेश्वरला आले आहेत. या वातावरणातील बदल नक्कीच त्यांना सुखावणारा आहे.