Sun, May 26, 2019 20:57होमपेज › Satara › ऐन पावसाळ्यात माण तालुका कोरडा ठणठणीत 

ऐन पावसाळ्यात माण तालुका कोरडा ठणठणीत 

Published On: Aug 03 2018 1:38AM | Last Updated: Aug 02 2018 11:18PMम्हसवड : पोपट बनसोडे 

राज्याच्या कानाकोपर्‍यात पावसाने यावर्षी थैमान मांडले असताना सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळी असलेल्या माण तालुक्यात पावसाने दडी मारली असून ऐन पावसाळ्यात 6 टँकरव्दारे 8 गावांसह 42 वाड्या-वस्त्यांना  टँकरच्या बारा  खेपाद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. तालुक्यात असलेली माणगंगा नदी कोरडी ठणठणीत पडली आहे. माणची जनता ऐन पावसाळ्यात टँकरच्या पाण्यावर तहान भागवत आहे. दरम्यान येत्या काही दिवसात पावसाने हजेरी लावली नाही तर माण तालुक्यात दुष्काळ पडण्याची भिती आहे.

माणमध्ये ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. टँकर भरण्यासाठी  पाच विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. अनेक गावातून टँकरची मागणी वाढू लागली आहे.पानवन गावातील महिला वर्गासह अबालवृध्द पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन मैल भटकत आहेत. पावसाअभावी पिके माना खाली टाकू लागल्यामुळे खरिप हंगाम वाया जाणार असल्याची भिती व्यक्त केली जात असून  बळीराजा दुबार पेरणीच्या भितीने हवालदिल  झाला आहे.

सध्या पुकळेवाडी,  विरळी, पांगरी, पिंगळी खुर्द, उकिर्डे, मोगराळे, तोंडले, जाधववाडी या पाच गावांसह बेचाळीस वाड्या-वस्त्यांना टँकर सुरु आहेत. वडगाव, पिंपरी, टाकेवाडी, कोळेवाडी, महिमानगड, वळई, भाटकी, चिलारवाडी, भालवडी, बिदाल आणि बोडके गावाचे टँकर मागणीचे प्रस्ताव माण तहसील कार्यालयाकडे पाठवले आहेत तर पानवन गावाचा माण पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे प्रस्ताव आला आहे.

माण तालुका हा कायम दुष्काळी तालुका. सन 2013 मध्ये माणवासिय जनतेने  दुष्काळाशी मोठा संघर्ष केला आहे. जनावरांच्या चारा छावण्यांवरच गावेच्या गावे वसली होती. त्या दुष्काळी आठवणी ताज्या असताना या वर्षीही माण तालुक्याची दुष्काळाच्या दिशेनं वाटचाल सुरू झाल्याची चाहूल लागली आहे. जनता पिण्याच्या पाण्यासाठी रात्रं दिवस वनवन भटकू लागली आहे. आठ गावे टँकरच्या पाण्यावर तहान भागवत आहेत.

पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. बाजरी मका ही पिके माना टाकू लागली आहेत तर कांदा, भुईमुग, ऊस, डाळिंब, द्राक्ष या पिकांच्या पाण्याचा विचार न केलेलाच बरा.  माणगंगा नदी कोरडी पडली असून उरमोडीच्या पाण्याने नदीचीच तहान भागली नाही. मग, माणसांची तहान भागणार कशी? कुकुडवाड गटातील विरळी व पुकळेवाडी या दोन गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. वळई,  आगासवाडी, चिलारवाडी, शेनवडी, काळचौडी या गावांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. गोंदवले गटातील   पिंपरी या गावाला टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. पानवण या गावात टँकरची मागणी असूनही अद्यापपर्यंत टँकर दिला गेला नाही. या गावासाठी सुमारे एक कोटी रूपये खर्च करून सात वर्षापूर्वी भारत निर्माण पेयजल योजनेतून ढाकणी तलावातून पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे काम सुरू करण्यात आले होते. ढाकणी ते पानवण सुमारे सहा किमी पाईपलाईनचे कामही झाले आहे.परंतू अद्यापपर्यंत ही योजना का पूर्ण झाली नाही? असा सवाल केला जात आहे.

या योजनेपूर्वीची मिनीवॉटर सप्लाय योजना बंद अवस्थेत आहे.दोन योजना असून बंद असल्याने ‘असून अडचण नसून खोळंबा’, अशी अवस्था पानवणकरांची झाली आहे.  चार हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील माता भगिनींना दोन दोन किमी भटकंती करावी लागत आहे. मुरूमशेडा  व  खिंडवाडी या वस्त्यांकडील विहिरीकडे धाव घ्यावी लागत आहे. पावसाअभावी विहिरीही कोरड्या पडू लागल्या आहेत.विहिरीतून पाणी काढणे महिलांना अवघड होत आहे. जीव धोक्यात घालून महिला पाण्यासाठी दाहीदिशा भटकत आहेत. धामणी गावाची अवस्थाही बिकट होत चालली आहे.

मार्डी गटातील संभूखेड गावातील शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून खरिप पिके माना टाकू लागली आहेत. हवलदारवाडी, भालवडी, कारखेल, धुळदेव ही गावेही दुष्काळाच्या छायेत आहेत. 
बिदाल गटातील बिजवडी, तोंडले या गावातून टँकरची मागणी होत आहे. जाधववाडी, मोगराळे या गावात टँकर सुरू आहे. पाचवड, हस्तनपूर, दानवलेवाडी   या  गावातही दुष्काळीपरिस्थिती आहे तर महिमानगड गटात पिंगळी येथे टँकर सुरू असून महिमानगड, उर्किडे, पांढरवाडी, स्वरूपखानवाडी आदि गावातील शेतकरीवर्ग पावसाअभावी हवालदिल झाला आहे. तालुक्यातील मलवडी गटात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याने शेतकरी वर्गात समाधान दिसत आहे.पिण्याच्या पाण्याची समस्या सद्या भेडसावत नसली तरी भविष्यात पाऊस पडला नाही तर परिस्थिती  चिंताजनक होणार हे निश्‍चित आहे.