Thu, Apr 25, 2019 11:30होमपेज › Satara › दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी माणवासीयांनी योगदान द्यावे : गिरीष कुलकर्णी

दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी माणवासीयांनी योगदान द्यावे : गिरीष कुलकर्णी

Published On: Apr 27 2018 1:10AM | Last Updated: Apr 26 2018 8:37PMम्हसवड : प्रतिनिधी

वडजलकरांनी पाणी चळवळीला अधिक गतिमान करण्यासाठी महाश्रमदान अभियान सुरू करून एक पाऊल पुढे टाकले आहे. दुष्काळी माणचा कलंक पुसण्यासाठी माणवासीयांनी तन मन धन अर्पण करून योगदान द्यावे, असे उदगार सिने अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी काढले.

पाणी फौंडेशन स्पर्धेत सहभाग घेतलेल्या वडजल  ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या महाश्रमदान अभियानात मार्गदर्शन करताना कुलकर्णी बोलत होते. यावेळी आ. जयकुमार गोरे, जि.प. सदस्य सुवर्णा देसाई, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष अनिल देसाई, सिने अभिनेते जितेंद्र जोशी, पं. स. सदस्य तानाजी काटकर, उद्योग मंत्रालयाचे उपसचिव डॉ. नामदेव भोसले, उपजिल्हाधिकारी राजेश काटकर, तहसीलदार सुरेखा माने व मान्यवर उपस्थित होते.

कुलकर्णी म्हणाले, दुष्काळ हा माणच्या जनतेच्या पाचवीला पुजलेला आहे. हा कलंक पुसून टाकण्याची धमक माणदेशी माणसांत नक्की आहे. फक्त माणदेशी जनतेनं आपल्या दोन्ही हातानी काळ्या मातेची सेवा करायची आहे. भुगर्भात पाणी साठा शिल्लक न राहिल्याने जलसंकट उभे राहिले आहे. स्पर्धेच्या माध्यमातून लोकांनी दुष्काळ मिटविण्याचा विडा उचलला आहे. दुष्काळ हटाव ह्या मोहिमेत कायम दुष्काळी माणदेशी माणसानी योगदान द्यावे. जितेंद्र जोशी म्हणाले, वडजलकर बांधवांनी महाश्रमदान अभियान राबवून एक पाऊल पुढे टाकले आहे. ही चळवळ यशस्वी करून आपलं गाव पाणीदार करा.  नगराध्यक्ष तुषार विरकर, सनिल पोरे, अशोकशेठ सावंत, किरकसालचे सरपंच अमोल काटकर, सरपंच रामचंद्र सावंत  व ग्रामस्थ उपस्थित होते.