Mon, Apr 22, 2019 15:41होमपेज › Satara › माण तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर 

माण तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर 

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 26 2018 10:20PMम्हसवड : पोपट बनसोडे 

सातारा जिल्ह्यात माणमध्ये दुष्काळी परिस्थिती असून   एकमेव असलेली माणगंगा नदी कोरडी ठणठणीत पडली आहे. आंधळी धरणातही पाण्याचा ठणठणाट  आहे. तालुक्यातील अनेक गावात टँकर सुरू असून पेरलेली पिके वाळून जाण्याचा धोका आहे.  माण तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर असून या तालुक्यासाठी विशेष दुष्काळी पॅकेज जाहीर करण्याची मागणी होत आहे.

माणमध्ये काही तलावातून उरमोडीच्या पाण्याचा कृत्रिम पाणीसाठा असून तोही थोड्या दिवसातच संपुष्टात येणार आहे. ओढे- नाले, बोअर, बंधारे, विहिरी कोरड्या पडल्या आहेत.खरीप हंगाम वाया जाण्याच्या मार्गावर आहे. पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न बिकट होतं चाललाय. पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेली गावे टँकरची मागणी करत आहेत. गौरी-गणपतीच्या काळात पाऊस पडला नाही तर माणवासियांवर स्थलांतर करण्याची वेळ येण्याची भिती आहे. दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या माण-खटाव या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहिर करून विशेष  पॅकेज द्यावे अन्यथा शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशा संतप्त भावना शेतकर्‍यांकडून व्यक्त केेल्या जात आहेत.

माण तालुक्यात पावसाने दडी मारली असून ऐन पावसाळ्यात सहा टँकरव्दारे  आठ गावांसह बेचाळीस वाड्या-वस्त्यांना  टँकरच्या बारा  खेपाद्वारे पाणी पुरविण्यात येत असून माणगंगा कोरडी पडली आहे. माणची जनता ऐन पावसाळ्यात टँकरच्या पाण्यावर तहान भागवत आहे. अनेक गावातून टँकरची मागणी वाढू लागली आहे. पानवन गावातील महिला, अबालवृध्द पिण्याच्या पाण्यासाठी मैल मैल वनवन भटकत आहेत.  या वर्षी पावसाअभावी खरिप हंगाम वाया जाणार असल्याची भिती व्यक्त केली जात असून  बळीराजा दुबार पेरणीच्या भितीने हवालदिल  झाला आहे.  काही दिवसात पावसाने हजेरी लावली नाहीतर माण तालुक्याची दुष्काळाच्या दिशेने वाटचाल सुरू होणार आहे.

टँकर भरण्यासाठी  माणमध्ये पाच विहिरीअधिग्रहण केल्या आहेत. सध्या पुकळेवाडी, विरळी, पांगरी, पिंगळी खुर्द, उकिर्डे, मोगराळे, तोंडले, जाधववाडी या पाच गावांसह बेचाळीस वाड्या-वस्त्यांना टँकर सुरु आहेत. वडगाव, पिंपरी, टाकेवाडी, कोळेवाडी, महिमानगड, वळई, भाटकी, चिलारवाडी, भालवडी, बिदाल आणि बोडके गावचे टँकर मागणीचे प्रस्ताव माण तहसील कार्यालयाकडे पाठवले आहेत तर पानवनचा प्रस्ताव माण पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे आला आहे.

सन 2013 मध्ये माणवासिय जनतेने  दुष्काळाशी मोठा संघर्ष केला आहे.जनावरांच्या चारा छावण्यावरच गावेच्या गावे त्यावेळी वसली  होती. या दुष्काळी आठवणी ताज्या असताना या वर्षीही माण तालुक्याची दुष्काळाच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे.जनता पिण्याच्या पाण्यासाठी रात्रं दिवस भटकू लागली आहे. 

पावसाने दडी मारल्याने बाजरी, मका ही पिके  माना टाकू     लागली आहेत तर कांदा, भुईमुग, ऊस, डाळिंब, द्राक्ष या पिकांच्या पाण्याचा विचार न केलेलाच बरा.  उरमोडीच्या पाण्याने नदीचीच तहान भागली नाही मग माणसांची तहान भागणार कशी? विरळी व पुकळेवाडी या गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. वळई,  आगासवाडी, चिलारवाडी, शेनवडी, काळचौंडी या गावांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.गोंदवले गटातील    पिंपरी या गावाला टँकरने पाणी सुरू आहे. पानवणमध्ये टँकरची मागणी असून अद्याप टँकर दिला गेला नाही. या गावासाठी एक कोटी रूपये खर्च करून सात वर्षापूर्वी भारत निर्माण पेयजल योजनेतून ढाकणी तलावातून पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे काम सुरू करण्यात आले होते. ढाकणी ते पानवण असे 6 किमी पाईपलाईनचे काम झाले आहे. परंतू अद्यापपर्यंत ही योजना अपूर्ण आहे. त्यापूर्वीची मिनीवॉटर सप्लाय योजना बंद अवस्थेत आहे. मुरूमशेडा व खिंडवाडी या वस्त्याकडील विहिरीकडे धाव घ्यावी लागत आहे. विहिरीही कोरड्या पडू लागल्या आहेत. विहिरीतून पाणी काढणे महिलांना अवघड होत आहे.धामणी गावची अवस्थाही बिकट होत चालली आहे. मार्डी गावावर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. संभूखेड गावातील शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

हवलदारवाडी, इंजबाव, भालवडी, कारखेल, धुळदेव ही गावे दुष्काळाच्या छायेत आहेत. बिजवडी, तोंडले गावातून टँकरची मागणी  आहे. जाधववाडी, मोगराळेत टँकर सुरू आहे. पाचवड, हस्तनपूर, दानवलेवाडी या गावांनाही दुष्काळात संघर्ष करावा लागत आहे. महिमानगड गटात पिंगळी येथे टँकर सुरू असून महिमानगड, उकिर्डे, पांढरवाडी, स्वरूपखानवाडी आदि गावातील शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.