Wed, May 27, 2020 07:50होमपेज › Satara › उदयनराजे- कोल्हेंची बंद खोलीत चर्चा; कोल्हे म्हणतात मावळा छत्रपतींचे मन वळवू शकत नाही (video)

उदयनराजे- कोल्हेंची बंद दाराआड चर्चा, भेटीनंतर कोल्हेंचा मोठा खुलासा (video)

Published On: Sep 02 2019 4:35PM | Last Updated: Sep 02 2019 4:49PM

उदयनराजे- कोल्हेंची बंद खोलीत चर्चासातारा : पुढारी ऑनलाईन 

साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जबरदस्त प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी साताऱ्यात जाऊन उदयनराजे बंद खोलीत चर्चा केली. या चर्चेचा तपशील अधिक कळू शकला नसला, तरी कोल्हेंनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून चर्चा असफल झाल्याचे दिसून  येत आहे. 

कोल्हे म्हणाले, की उदयनराजेंवर संपूर्ण महाराष्ट्राचं प्रेम असल्याने ते आपल्यासोबत असावे असे प्रत्येकाला वाटते. उदयनराजे योग्य निर्णय घेतील. त्यांची राष्ट्रवादीला साथ हवी. खासदार अमोल कोल्हे यांनी सातार्‍यातील शासकीय विश्रामगृहावर उदयनराजे यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे पाऊणतात बंद दाराआड चर्चा झाली. उदयनराजेंचे मन वळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत का? असे विचारले असता डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, खा. उदयनराजे हे माझे मार्गदर्शक असून मी त्यांचा चाहता आहे. ऐतिहासिक मालिकांविषयी त्यांच्याशी बोललो.  छत्रपतींचा मावळा म्हणून मी त्यांचं मन वळवू शकत नाही. छत्रपती हे निर्णय घेत असतात. 

उदयनराजे यांच्यावर महाराष्ट्राचं प्रेम असल्याने ते आपल्यासोबत असावेत असे प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक आहे. त्यांची आम्हालाही साथ असावी. स्वयंभू व्यक्तिमत्व स्वत: निर्णय घेत असतात. ते योग्य निर्णय घेतील. त्यांच्या भावी वाटचालीस माझ्या शुभेच्छा आहेत, असेही त्यांनी सांगितले.

खासदार उदयनराजे म्हणाले, टीव्ही सिरीयल सुरु होण्यापूर्वी पासून कोल्हे माझे मित्र आहेत. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नका. राजकारणाने एक दिवस गजकरण होतं, असेही उदयनराजेंनी सांगितले. यावेळी चित्रखेला माने-कदम, सुनील काटकार आदी उपस्थित होते. 

दस्तुरखुद्द उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे त्यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उदयनराजे कोणती भूमिका घेतील यावरून अजूनही संभ्रम कायम आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेच्या तोंडावरच भगदाड पडले असून उदयनराजे यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी दिल्यास राष्ट्रवादीचा पाय आणखी खोलात जाणार आहे. एकाबाजूने नेत सोडून जात असतानाच राज्य बँकेतील घोटाळ्यावरून गुन्हा नोंद करण्याचा आदेश न्यायालयाने दिल्याने राष्ट्रवादीवर संकटाची मालिका ओढावली आहे.