Tue, Nov 20, 2018 01:15होमपेज › Satara › खासदार राजू शेट्टी काँग्रेससोबत येतील : खासदार अशोक चव्हाण

खासदार राजू शेट्टी काँग्रेससोबत येतील : खासदार अशोक चव्हाण

Published On: Sep 03 2018 12:54PM | Last Updated: Sep 03 2018 6:39PMकराड : प्रतिनिधी

मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीवेळी आपल्याकडून चूक झाली. चुकीची माणसे सत्तेवर गेली. शेतकऱ्यांशी त्यांना काही देणेघेणे राहिलेले नाही, असे खासदार राजू शेट्टी जाहीरपणे बोलत आहेत. खासदार राहुल गांधी यांचीही त्यांनी भेट घेतली आहे. त्यामुळे आता ते भाजपसोबत जाणार नाहीत, ते निश्चितपणे काँग्रेससोबत येतील,  असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सोमवारी कराडमधून खटावकडे रवाना झाली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हा विश्वास व्यक्त केला. खासदार राजू शेट्टी यांनी खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. मागील निवडणुकीत भाजप सरकारला पाठिंबा देऊन केलेली चूक त्यांच्या लक्षात आली आहे. हे त्यांनी अनेकदा बोलूनही दाखवली आहे. भाजपला सत्तेवरून पायउतार करणे आवश्यक आहे. आपल्यासोबत ही त्यांनी चर्चा केली आहे मात्र अद्यापही जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही मात्र असे असले तरी राजू शेट्टी भाजपसोबत जाणार नाहीत ते काँग्रेससोबतच येतील असा विश्वास खासदार चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रवादीसोबत आघाडी होणारच 

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी निश्चित आहे. राष्ट्रवादीकडून जागावाटपाचा कोणताही प्रस्ताव अद्याप आपल्याकडे आलेला नाही. मात्र ज्या मतदारसंघात या पक्षाची ताकद जास्त त्या पक्षाच्या उमेदवाराला संधी मिळणार आहे. त्यामुळे निश्चित कोणत्या पक्षाला किती जागा हे आत्ताच बोलता येणे शक्य नाही.