Sun, Apr 21, 2019 04:01होमपेज › Satara › दोन आमदार वरिष्ठांच्या संपर्कात

दोन आमदार वरिष्ठांच्या संपर्कात

Published On: Mar 10 2018 2:07AM | Last Updated: Mar 09 2018 11:21PMकराड : प्रतिनिधी 

लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाचवेळी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुकांबाबतची तयारी भाजपने जवळपास पूर्ण केल्याचे सांगत सातारा, कराड दक्षिण, कराड उत्तरसह कोरेगाव या चार विधानसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्याचबरोबर दोन विद्यमान आमदारही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केला आहे.

येथील शासकीय विश्रामगृहात शिवजयंतीबाबत आयोजित पत्रकार परिषदेनंतर झालेल्या अनैपचारिक गप्पांवेळी विक्रम पावसकर यांनी हा गौप्यस्फोट करत एकच खळबळ उडवून दिली आहे. 
पावसकर म्हणाले, विधानसभा व लोकसभा निवडणूक एकाचवेळी होण्याची शक्यता अधिक आहे. लोकसभा निवडणुकीत कोण उमेदवार असेल? याबाबत आत्ताच भाष्य करणे धाडसाचे ठरेल. मात्र, या निवडणुकीत सुमारे साडेतीन लाख मते भाजप उमेदवाराला मिळतील, इतकी तयारी आम्ही पदाधिकार्‍यांनी केली आहे. याशिवाय कराड दक्षिण, सातार्‍यासह कराड उत्तर आणि कोरेगाव या चार विधानसभा मतदारसंघांवर आम्ही विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. या चारही ठिकाणी भाजपचे विधानसभा उमेदवार विजयी व्हावेत, यासाठी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते प्रयत्नांची शिकस्त करतील, असे संकेतही पावसकर यांनी यावेळी दिले.

त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार कोण असेल? याबाबत विविध तर्कविर्तक सुरू आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी खा. श्री छ. उदयनराजे भोसले यांनीही जोरदार शक्‍तीप्रदर्शन केले असून त्यांच्या नावाची चर्चा लोकांमध्ये सुरू असल्याकडे पावसकर यांचे लक्ष वेधले असता पावसकर यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्‍त केली. सद्य:स्थितीत आमच्या पक्षात याबाबत कोणतीच हालचाल नाही. तसेच योग्यवेळी त्या - त्या परिस्थितीनुसार निर्णय होतील, असेही पावसकर यांनी स्पष्ट केले. 

याशिवाय जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदारही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. विधानसभा निवडणुका लवकर होण्याची शक्यता असल्याने येत्या नोव्हेंबरमध्ये महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील आणि ते दोन्ही आमदार स्वत:ची भूमिका जाहीर करतील, असे सूतोवाचही विक्रम पावसकर यांनी केले आहे. पावसकर यांच्या या गौप्यस्फोटामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.