Sun, May 26, 2019 11:40होमपेज › Satara › निवडणुकीसाठी दीपक पवारांचे गुडघ्याला बाशिंग

निवडणुकीसाठी दीपक पवारांचे गुडघ्याला बाशिंग

Published On: Feb 17 2018 2:08AM | Last Updated: Feb 16 2018 11:19PMसातारा : प्रतिनिधी

राज्यात आणि केंद्रात जरी भाजपाची सत्ता असली तरी एक आमदार म्हणून मी सातारा- जावली मतदारसंघातील सर्वप्रकारची कामे मार्गी लावली आहेत. चंद्रकांतदादा पाटील हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असल्याने त्यांच्याकडेही अनेकदा पाठपुरावा करुन सातारा आणि जावलीतील विविध रस्त्यांसाठी निधी आणला. सत्ता भाजपची असली तरी मतदारसंघाचा आमदार म्हणून अनेक कामांसाठी निधी मंजूर करुन घेवून ती कामे पूर्ण केली आहेत. हे दिपक पवारांना माहित नसले तरी जनतेला माहिती आहे. दिपक पवार यांनी विधानसभेसाठी जरा लवकरच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे, अशी टिका आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी एका पत्रकाद्वारे केली. 

आमदार फंड 35 लाख असतो मग 80 कोटी आणले कोठून? असा सवाल करणार्‍या दीपक पवारांना विकासकामे आणि त्यासाठी निधी कसा मिळतो? याचे किती ज्ञान आहे हे त्यांनीच उघड केले आहे. आमदार फंडाशिवाय जी  मोठी कामे असतील, त्यासाठी राज्य  आणि केंद्र शासनाकडून निधी आणावा लागतो, याचा गंधही पवारांना नाही. कारण, विधानसभेची स्वप्ने पवारांना पडू लागली आहेत. पावसाळयात उगवणार्‍या भुछत्राप्रमाणे निवडणूक आली की दिपक पवार नावाचे भुछत्र उगवते, हे सातारा- जावली मतदारसंघातील तमाम जनतेला माहित आहे, असेही आ. शिवेंद्रराजे यांनी पत्रकात म्हटले आहे. 

सरकार भाजपचे आहे म्हणून मतदारसंघातील विकासकामांसाठी भाजपने निधी आणला, अशी फेकाफेकी करुन जनतेची दिशाभूल करण्याचा  केविलवाणा उद्योग पवारांना निवडणुकीत तारणार नाही, हे पवारांनी लक्षात ठेवावे.  निधी मंजूर करण्यासाठी आधी प्रस्ताव पाठवावा लागतो, याचे ज्ञान तरी दिपक पवारांना आहे का? चिखली धरणाच्या निधीसाठी कोणाच्या सुचनेवरुन पाटबंधारे विभागाने प्रस्ताव पाठवला होता? त्याला कोणाचे पत्र जोडले, याची माहिती घेवून  पवारांनी तिही माहिती प्रसिध्द करायला हवी होती. 

प्रस्ताव पाठवल्यानंतर संबंधीत मंत्र्यांकडे, सचिवांकडे जावून पाठपुरावा करुन निधी मंजूर करुन आणावा लागतो. केवळ आमचे सरकार, आमचे सरकार असा उर बडवून निधी मिळत नसतो, याचे भान पवारांनी ठेवले पाहिजे. प्रस्ताव आम्ही पाठवायचे, पाठपुरावा करुन निधी मंजूर करुन घ्यायचा आणि निधी आला की, भाजपची सत्ता असल्यामुळे मीच निधी आणला या आविर्भावात तोंडाला येईल ते बडबडायचे. हा तुमचा उद्योग जनतेला नवीन नाही, असेही आ. शिवेंद्रराजे यांनी पत्रकात म्हटले आहे. 

कावळ्याने पांढरा रंग फासला म्हणून तो कधीही बगळा होत नाही.विकासकामे कशी मंजूर होतात, निधी कसा उपलब्ध होतो? याची दीपक पवारांनी माहिती घ्यावी, असा सल्लाही आ. शिवेंद्रराजे यांनी पत्रकात दिला आहे.