Tue, Apr 23, 2019 23:57होमपेज › Satara › लावंघर सिंचन योजना मार्गी लावू : आ.शिवेंद्रराजे भोसले

लावंघर सिंचन योजना मार्गी लावू : आ. शिवेंद्रराजे भोसले

Published On: Mar 21 2018 1:43AM | Last Updated: Mar 20 2018 11:17PMसातारा : प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षांपासून लावंघर खोर्‍यातील गावांना उरमोडी धरणाचे पाणी सिंचनासाठी उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न सुरु होता. दरम्यान, उघड्या पाटाने पाणी नेण्याऐवजी आता बंदीस्त पाईपलाईन टाकून पाणी नेण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे पाणी त्याच तालुक्यात सिंचनासाठी वापरता येणार आहे. येत्या आठवडाभरात बंदीस्त पाईपलाईनसाठी सर्व्हे सुरु केला जाणार असून लावंघर खोर्‍यासाठी वरदान ठरणारी ही योजना लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केले. 

लावंघर उपसा सिंचन योजनेसंदर्भात आ. शिवेंद्रराजे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राजू भोसले, विद्यमान सदस्या सौ. कमल जाधव, पंचायत समिती सदस्या सौ. विद्या देवरे, पाटबंधारे विभागाचे (उरमोडी) कार्यकारी अभियंता शशिकांत गायकवाड यांच्यासह लावंघर आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. 

बैठक सुरु होतानाच उपस्थित ग्रामस्थांनी आमच्या शेतीला पाणी मिळावे, अशी मागणी आ. शिवेंद्रराजे यांच्याकडे केली. उरमोडी धरणातून सातारा तालुक्यात बंदीस्त पाईपलाईनने पाणी जाणार असल्याने 25 टक्के पाणी बचत होणार आहे. शासनाच्या धोरणानुसार त्या 25 टक्के पाण्याचा उपयोग लावंघर खोर्‍यातील गावांना सिंचनासाठी करावा, यासाठी आपण स्वत: पाठपुरावा करत आहोत. कृष्णा खोरे महामंडळाकडे पत्रव्यवहार करुन लावंघर उपसा सिंचन योजनेच्या अंमलबजावणीसाठी सकारात्मक निर्णय झाला आहे. त्यानुसार पाटबंधारे विभागाकडून सर्व्हे करण्यात येणार असल्याचे आ. शिवेंद्रराजे यांनी सांगितले. 

कार्यकारी अभियंता गायकवाड यांनी येत्या आठवडाभरात सर्व्हेचे काम सुरु करणार असल्याचे सांगितले. ज्या ठिकाणी पाणी हवे आहे तेथे चेंबरची सुविधा केली जाणार आहे.अनेक ठिकाणी गाव खाली आणि जमीन वर अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त क्षेत्रास कसा होईल याचा विचार करुन बंदीस्त पाईपलाईन टाका, अशा सूचना आ. शिवेंद्रराजे यांनी अधिकार्‍यांना केल्या. 

यावेळी अशोक अडागळे, मधूकर शिंदे, महेंद्र शिंदे, दादा शिंदे, बाजार समितीचे संचालक नानासो गुरव, राजेंद्र पवार, तानाजी देवरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.   

Tags : satara , satara news, MLA Shivendra Raje Bhosale, Lavanghar, irrigation, scheme, approve