Sun, Mar 24, 2019 16:45होमपेज › Satara › नाकर्तेपणाचे खापर दुसर्‍यावर फोडून प्रश्‍न सुटणार का?

नाकर्तेपणाचे खापर दुसर्‍यावर फोडून प्रश्‍न सुटणार का?

Published On: Aug 29 2018 1:44AM | Last Updated: Aug 28 2018 11:12PMसातारा : प्रतिनिधी

सातारा पालिकेचा कारभार रामभरोसे चालू असल्याने सातारकरांचे अतोनात हाल सुरु आहेत. सातारा शहर म्हणजे खड्डयांनी भरलेले रस्ते आणि कचर्‍याने वाहणार्‍या कुंड्या अशी परिस्थिती आहे. त्यातच गणेशमूर्ती विसर्जनाचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. वास्तविक विसर्जनाची जबाबदारी ही सातारा नगरपालिकेची आहे. असे असताना सातारा पालिकेचा कुचकामी, नियोजनशुन्य कारभार आणि स्वत:चा नाकर्तेपणा लपवण्यासाठी आपले लोकप्रिय खासदार मात्र जिल्हाधिकार्‍यांना दगड संबोधून लपण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वत:चा नाकर्तेपणा लपवून विसर्जनाचा प्रश्‍न सुटणार आहे का? असा सवाल करतानाच गणेशमूर्ती विसर्जनाला तोशिष लागली तर सातारकर तुम्हाला माफ करणार नाहीत, असा इशारा आ.  शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला आहे. 

गणेशोत्सव तोंडावर आला असून गणेशोत्सवानंतर गणेशमूर्ती कोठे विसर्जीत करायच्या? असा गहन प्रश्‍न निर्माण झाला आहे. सातारा शहरातील गणेश मंडळांच्या मुर्तींचे विसर्जन कोठे करायचे याबाबत निर्णय घेण्यास आणि तोडगा काढण्यास सातारा पालिकेने खूपच उशीर केला आहे. आता गणेश मंडळांच्या बैठका घेवून आणि चर्चा करुन सत्ताधारी आपली चूक लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. वास्तवीक विसर्जन कोठे करायचे याचा निर्णय गणेश मंडळे घेवू शकत नाहीत. त्यामुळे चर्चेचा फार्स कशासाठी केला? काही दिवसांपूर्वीच खासदारांनी रिसालदार तळ्यात विसर्जन करण्याचा निर्णय जाहिर केला होता. पोलीस प्रशासनाने मात्र विसर्जनास नकार दिला आहे. त्यामुळे मूर्ती विसर्जनाचा प्रश्‍न आता जटील बनला आहे. त्यामुळे खुशीत गाजरे खाणार्‍यांची झोप उडाली आहे. त्यामुळेच त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दगडाची उपमा देवून आपला नाकर्तेपणा लपवण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हाधिकारी म्हणजे म्हटलं तर देव आणि म्हटलं तर दगड, असे म्हणणार्‍यांना जनाची नाही तर, मनाची तरी लाज वाटायला हवी होती, अशा शब्दात आ. शिवेंद्रराजे यांनी खासदारांच्या बेडगी प्रेमाचा समाचार घेतला आहे. 

वाळू ठेक्यांचे परवाने हवे तसे मिळाले की जिल्हाधिकारी देव! आणि सातारा पालिकेतील भ्रष्टाचाराला चाप लावला की जिल्हाधिकारी दगड, तुम्हाला असे म्हणायचे आहे का? असा बोचरा सवालही आ. शिवेंद्रराजे यांनी उपस्थित केला आहे. निवडणुकीपूर्वी जी आश्‍वासने सातारकरांना दिली. त्यांना भावनीक करुन सत्ता मिळवली. आज त्याच सातारकरांची काय अवस्था करुन ठेवली आहे? सातार्‍यातील सगळ्याच रस्त्यांची चाळण झाली आहे. शहरातील सर्वच कचराकुंड्या ओसंडून वहात आहेत. सातारकरांना घरातून बाहेर पडणे आणि वाहन चालवणे मुश्किल बनले आहे. असे असताना खासदार मात्र साशा कंपनीच्या तालावर नाचत आहेत. डंपर आणि टीपर चालवून सातारकरांचे प्रश्‍न सुटतील, असा बालिशपणा दाखवणार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांनीच नगराध्यक्ष व्हावे असे म्हणणे म्हणजे आपली जबाबदारी झटकून जिल्हा प्रशासनाकडे बोट दाखवणे आहे. जिल्हाधिकार्‍यांना कशाला, ज्या साशा कंपनीमुळे सातारकरांचे जगणे मुश्किल झाले आहे, त्या साशा कंपनीलाच पालिका चालवण्यास द्या, म्हणजे तुमचे समाधान होईल,असेही आ. शिवेंद्रराजेंनी म्हटले आहे.

पैसा, टक्केवारी आणि कमिनश यातून बाहेर पडला तर, तुम्हाला सातारकरांच्या समस्या दिसतील. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांना दगड म्हणून समस्येपासून पळ काढण्यापेक्षा गणरायाच्या विसर्जनाचे विघ्न दूर करण्यासाठी सत्ताधारी आणि खासदारांनी याआधीच हालचाल करायला हवी होती. आता उच्च न्यायालयात जावून प्रश्‍न सुटणार आहे का? गणेश मूर्ती विसर्जनाचा प्रश्‍न सुटला नाही तर, सातारकर जनता तुम्हाला कदापी माफ करणार नाही, याचे भान ठेवा आणि तातडीने हा प्रश्‍न सोडवा. जिथे चुकीचा कारभार तिथे नगरविकास आघाडी तुम्हाला विरोधच करत आली आहे आणि सातारकरांच्या हितासाठी यापुढेही विरोध करत राहील, असा इशाराही आ. शिवेंद्रराजे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.