होमपेज › Satara › खा. उदयनराजेंशी मतभेद आहेत, मनभेद नाहीत

खा. उदयनराजेंशी मतभेद आहेत, मनभेद नाहीत

Published On: May 31 2018 1:47AM | Last Updated: May 31 2018 1:47AMखेड : वार्ताहर

युती सरकारमधील एखाद्या मंत्र्याशी वैयक्‍तिक स्वरुपात चांगले संबंध ठेवणे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी दुजाभाव असा अर्थ होत नाही. खा. उदयनराजे पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जावून कोणताही निर्णय घेत नाहीत. त्यामुळे ते राष्ट्रवादीचे खासदार आहेत. त्यांच्या वैयक्‍तिक विचारांशी मतभेद आहेत. पण मनभेद नाहीत, अशी स्पष्टोक्‍ती आ. शशिकांत शिंदे यांनी दिली. दरम्यान, सातार्‍यातील मेडिकल कॉलेजचा पाया राष्ट्रवादीनेच रचला असून आघाडी सरकारच्या काळात निर्णय लांबला. अन्यथा त्याचवेळी मेडीकल कॉलेजचा प्रश्‍न संपुष्टात आला असता असेही त्यांनी स्पष्ट केले. 

राष्ट्रवादी भवनात पत्रकारांशी संवाद साधताना  आ. शशिकांत शिंदे म्हणाले, सातार्‍यात मेडिकल कॉलेज उभारण्याचा निर्णय आमचे सरकार असताना झाला. यासाठी खावली येथील जागा पाहण्यात आली. वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महाविद्यालयाचा परिसर सातारा शहरालगत असणे आवश्यक होते. त्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाची कृष्णानगर येथील जागा निश्‍चित करण्यासाठी मी पालकमंत्री असताना नियामक मंडळामध्ये हा विषय आणला. जागेचा आराखडा तयार करुन मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठेवला. परंतु निर्णय का लांबला? याचे गुढ कळलेच नाही, असे सांगून ते म्हणाले, मेडिकल कॉलेजचा निर्णय त्याचवेळी झाला असता म्हणूनच आम्ही पाया रचला अन् युती सरकारने तो तडीला नेला. यात  पालकमंत्री विजय शिवतारेंचेही मोठे सहकार्य असल्याचे सांगून आ. शिंदे म्हणाले, पाकिस्तानची साखर वाटण्याचा जसा आनंद घेतला जातो तसा मेडिकल कॉलेजच्या जागेचा आनंदही भाजपचे कार्यकर्ते घेणारच. आता या कॉलेजच्या उभारणीसाठी राज्य व केंद्र सरकारने निधी उपलब्ध करुन जिल्ह्यातील हा प्रकल्प पूर्णत्वास नेणे जरुरीचे आहे.

राष्ट्रवादीचे आ. नरेंद्र पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना आ. शशिकांत शिंदे म्हणाले, आघाडीची मोठी ताकद मिळवण्यासाठी या वावड्या सुरु असून जाणीवपूर्वक मतदारांमध्ये संशय निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु आहे. यात कोणतेही तथ्य नाही. 

ते पुढे म्हणाले, खा. उदयनराजे हे राष्ट्रवादीचे खासदार असून पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जावून ते कोणताही निर्णय घेणार नाहीत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर त्यांचा ठाम विश्‍वास आहे. त्यांच्या व आमच्या विचारात मतभेद जरुर असतील पण मनभेद नसल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, दि. 1 जून रोजी पक्षाचे निरीक्षक संग्राम कोते-पाटील यांच्या उपस्थितीत वाढे फाटा येथील कार्यालयात वन बुथ टेन युथ या स्वरुपाचा युवकांचा मेळावा घेण्यात येणार आहे तर दि. 7 जून रोजी पक्षाच्या जिल्हाध्यक्षाची नियुक्‍ती करण्यात येणार आहे. तसेच दि. 1 रोजी जिल्ह्यात महागाई, पेट्रोल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार असल्याचे आ. शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, निवास शिंदे, दत्तानाना उतेकर उपस्थित होते.