Tue, Jun 02, 2020 00:07
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › रामराजेंसह आमदार शरद पवारांसोबत

रामराजेंसह आमदार शरद पवारांसोबत

Last Updated: Nov 24 2019 1:40AM
सातारा : प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षाचे नेते आ. अजित पवार यांनी पक्षाविरोधात बंड पुकारात उपमुख्यमंत्रिपद पटकावले तरी सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे खासदार व आमदार विधान परिषदेचे सभापती रामराजे ना. निंबाळकर यांच्यासह शरद पवार यांच्यासोबत राहिले आहेत. अजित पवार यांना जिल्ह्यात हा फार मोठा धक्‍का आहे. राष्ट्रवादीची पक्ष संघटनाही शरद पवार यांच्यासोबत आहे. 

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्‍ला आहे. पण या जिल्ह्याने शरद पवारांवर जेवढे प्रेेम केले तेच अजित पवारांवरही केले. मात्र, अजित पवार सातार्‍याचे पालकमंत्री होते तेव्हा सातार्‍याचे निर्णय त्यांच्या सल्ल्याने व्हायचे. तेव्हापासून राष्ट्रवादीची पक्ष संघटना थोरले पवार व धाकटे पवार यांच्यात अंतर्गतरीत्या विभागली होती. मात्र, शरद पवार देशाच्या सत्तेतून पायउतार झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष संघटनेत पूर्णपणे लक्ष घातले. सातारा जिल्ह्यात तर त्यांनी लगातार कार्यक्रमांचा सपाटा लावला. त्याचाच परिणाम सातारा जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे शरद पवारांच्या विचारांची झाली. त्याचेच द‍ृश्य परिणाम शनिवारच्या सत्ता नाट्यात दिसले. सातारा जिल्ह्याचे आमदार अजित पवारांच्या सोबत राहतील अशी खात्री त्यांना वाटली असावी. मात्र, दस्तुरखुद्द त्यांचे पाहुणे असलेले आ. मकरंद पाटील हेही त्यांच्यासोबत गेले नाहीत.

राष्ट्रवादीतून विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. दीपक चव्हाण हे आमदार आहेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे ना. निंबाळकर हे दिवसभरात अनेकदा शरद पवारांसोबत वाहिन्यांवर दिसले. त्यांनी शरद पवार यांच्यासोबतच असल्याचा निर्णयही सांगून टाकला. आ. दीपक चव्हाण हे रामराजेंचेच आमदार तेही शरद पवार यांच्या सोबत राहिले. आ. मकरंद पाटील यांचा फोन सकाळी नॉट रिचेबलच असतो. त्यामुळेच वाहिन्यांवर ते नॉट रिचेबल असे दाखवले गेले. मात्र, आ. मकरंद पाटील यांनी तातडीने आपला फोन सुरु केला व त्यांनी थेट शरद पवारांना फोन लावून आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर आपल्या फेसबुक व इन्स्टाग्रामवरुनही आ. मकरंद पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आ. बाळासाहेब पाटील हेही शरद पवार यांच्या सोबतच राहिले आहेत. राष्ट्रवादीचे खा. श्रीनिवास पाटील यांचीतर शरद पवारांसोबत मैत्री. त्यांच्या अधिकृत सोशल मीडियाच्या अकौंटवरुन त्यांनी आपण साहेबांसोबत असल्याचे स्पष्ट केले. विधान परिषदेचे सभापती, खासदार, आमदार यांच्यासह सातारा जिल्ह्याची पक्ष संघटना शरद पवारांसोबत राहिल्याने अजित पवारांना सातार्‍यात दणका बसला आहे. 

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत शिंदे हे अजित पवारांसोबत राहतील असे वाटले होते. मात्र, त्यांनीही शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. उलट शशिकांत शिंदे हे फुटलेले आमदार पवारांच्या दरबारात आणण्यासाठी धावपळ करताना दिसत होते. राष्ट्रवादी काँग्रेस हे एक कुटुंब आहे. हे कुटुंब असेच एकत्र व भक्कम रहावे, अशी माझी इच्छा आहे. मी आज अन् उद्याही पवारसाहेब व राष्ट्रवादीसोबतच राहणार, असे शिंदे म्हणाले. तर आ. दीपक चव्हाण म्हणाले,  आम्ही शरद पवार साहेबांसोबत असून साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. माजी आमदार प्रभाकर घार्गे म्हणाले,  अजित पवार यांनी घेतलेली भूमिका नक्‍की काय आहे हेच अद्याप कळेनासे झाले आहे. आम्ही आजही आणि उद्याही खा. शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबतच राहणार आहे.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने म्हणाले, सत्तास्थापनेबाबत अजित पवारांनी घेतलेला निर्णय आश्‍चर्यकारक आहे. अद्यापही पक्षाकडून बैठका सुरू आहेत. त्यामुळे  उद्यापर्यंत चित्र स्पष्ट होईल. मात्र, पक्ष एकसंघ व भक्कम राहिल. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख म्हणाले, अजित पवार यांच्याबाबत साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आम्ही राष्ट्रवादीसोबतच आहोत आणि पुढेही राहणार .

सत्ता मिळो अथवा न मिळो मी आदरणीय शरद पवार साहेबांसोबतच राहणार आहे. आदरणीय शरद पवार साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल.
- आ. मकरंद पाटील