कराड : प्रतिनिधी
मागील चार वर्षात शेतकऱ्यांना हमीभावासह उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा मिळावा, म्हणून केंद्र सरकारने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याबाबतची दिशा, धोरण आता निश्चित होऊ लागले आहे. त्यामुळेच भविष्यात शेतकऱ्यांना हमीभावासह ५० टक्के नफा मिळेल, असा विश्वास व्यक्त करत भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच शेतकऱ्यांना "अच्छे दिन' आणू शकतात, असा विश्वास राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष आमदार पाशा पटेल यांनी व्यक्त केला आहे.
आमदार पटेल हे मलकापूर (ता. कराड, जि. सातारा) येथील कृष्णा बँकेंतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले, केंद्र सरकारने हरभरा, वाटाणा, पामतेल यासह परदेशातून आणाव्या लागणाऱ्या कृषी उत्पादनांवर आयात शुल्क वाढवले आहे. देशातून ३० बिलियन डॉलर निर्यात होत होती, ती १०० बिलियन डॉलरवर नेण्याचे केंद्र सरकारने निश्चित केले आहे. १५० लाख मेट्रीक टन पामतेल आपल्याकडे आयात होत होते. त्यावरील आयात शुल्क शून्य टक्क्यावरून ५४ टक्क्यांवर नेले आहे.
शेती उत्पादनांच्या आयातीवर बंदी घालत निर्यातीला चालना देण्याची प्रत्यक्ष कार्यवाही केंद्र सरकारने सुरू केली आहे. त्याचबरोबर हमीभावासह उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देणे कसे शक्य आहे? यावरही केंद्र सरकारसह राज्य शासनाचा अभ्यास सुरू आहे. राज्य शासनाने गेल्यावर्षी महाराष्ट्रात राज्य कृषी मुल्य आयोगाची स्थापना केली असून असे करणारे महाराष्ट्र हे देशातील केवळ दुसरेच राज्य आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार आहेत. मात्र, त्यासाठी काही वेळ जरूर लागेल, असेही पटेल यांनी सांगितले.
Tags : pasha patel, BJP, farmer, achhe din, good days for farmer