Fri, May 24, 2019 02:32होमपेज › Satara › भाजपला 50 जागांपर्यंत खाली आणणार

भाजपला 50 जागांपर्यंत खाली आणणार

Published On: Aug 14 2018 1:05AM | Last Updated: Aug 14 2018 12:40AMसातारा : प्रतिनिधी

केंद्र आणि राज्यातील सरकारांबाबत जनता उदासीन असून निवडणुकीत त्याचा उठाव दिसेल. राज्य सरकारच्या निष्क्रिय कामगिरीबाबत आम्ही जनतेच्या दारात जाऊन गार्‍हाणे मांडणार आहोत. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला 50 जागांपर्यंत खाली आणू, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सातार्‍यात पत्रकार परिषदेत व्यक्‍त केला. दरम्यान, खा. उदयनराजेंबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नसून लोकसभेच्या त्यांच्या उमेदवारीबाबत पक्षच निर्णय घेईल, अशी स्पष्टोक्‍तीही आ. जयंत पाटील यांनी दिली.

यावेळी राज्याच्या विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादीचे प्रतोद आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर प्रमुख उपस्थित होते. 

जिल्ह्यात बुथ लेवल कमिट्यांचे चांगले काम झाले असून त्या माध्यमातून सध्याचे सरकार विविध ठिकाणी कसे अपयशी ठरले हे लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या बंडखोरांमुळे भाजपचा विजय झाला. या निवडणुकीत झालेल्या चुका दुरुस्त करून आगामी निवडणुका लढवल्या जातील. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेससोबत वाटाघाटी झालेल्या नाहीत. मात्र, सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहील, अशी ग्वाही आ. जयंत पाटील यांनी दिली. 

या बैठकीला उदयनराजेंना का बोलावले नाही? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जागा वाटपचा फॉर्म्युला कसा राहील? उदयनराजे म्हणतात लोकसभेला मीच उमेदवार. सातारा लोकसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारी देणार, सातारा मतदारसंघाची जागा कुठल्या पक्षाकडे असेल? असे विचारले असता  आ. पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीला अद्यापही वेळ आहे. यासंदर्भात राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पक्षीय पातळीवर निर्णय झाला आहे. राज्यात वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यावर जाहीर केले जाईल. पण सातारा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहिल. खा. उदयनराजे भोसले हे सध्या राष्ट्रवादीचे  खासदार असल्यामुळे याठिकाणी मीच  निवडणूक लढणार, असे म्हणत असतील. पण यासंदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही. जिल्ह्यातील आमदार तसेच मुख्य कार्यकर्त्यांना यासंदर्भात विचारात घेवून निर्णय घ्यावा लागेल. सल्‍लामसलत केली जाईल. सर्व कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे. पक्ष काय निर्णय घेईल हे सांगता येत नाही. उदयनराजे हे जिल्ह्याचे खासदार असून सर्व आमदार संघटित होवून त्यांचा एकत्रित निर्णय व्हायला हवा,  असेही आ. पाटील यांनी सष्ट केले. 

सांगली महानगरपालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व असतानाही पराभवाचा सामना का करावा लागला, यातून आघाडीने काय बोध किंवा धडा घेतला का? मतमोजणीवेळी निकाल उलटा फिरत गेला, असे विचारले असता आ. जयंत पाटील म्हणाले, सांगलीतील पराभव राष्ट्रवादी काँग्रेसने स्वीकारला आहे. पण या निवडणुकीत भाजपला 34 टक्के तर आघाडीला 37  टक्के मते मिळाली आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्वांत कमी 34 तर काँग्रेसने 44 जागा लढवल्या आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवारांना 1 लाख 81 हजार मते मिळाली. राष्ट्रीय काँग्रेसला 2 लाख तर भाजप उमेदवारांना 3 लाख 26 हजार मते मिळाली. सेनेला नगण्य मते मिळाली. राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेल्या उमेदवारांना 64 हजार तर काँग्रेसमधून बंडखोरी करणार्‍या उमेदवारांना 50 हजार मते मिळाली. म्हणजेच तिकीट न दिल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीतून फुटलेल्या उमेदवारांनी 1 लाख 14 हजार मते घेतली. आघाडीतील उमदेवार तसेच बंडखोरांना मिळालेल्या मतांचा विचार केला तर 4 लाख 96 हजार मते यांना मिळाली. त्या तुलनेत भाजप उमेदवारांना 3 लाख 47 हजार मते मिळाली. याचाच अर्थ सर्वपातळीवर प्रयत्न करुनही भाजपच्या विरोधात सर्वसामान्य आहेत, हे यावरुन सिध्द होते. लोकांना भाजप पक्ष मान्य नाही.

पण या निवडणुकीत नवख्या उमेदवारांना लक्षणीय मते मिळाली आहेत. याउलट अनुभवी उमेदवारांचा थोडक्यात पराभव झाला. त्यामुळे या निवडणुकीसंदर्भात संदिग्ध परिस्थिती होती. मतमोजणीदिवशी दुपारपर्यंत आघाडीचे उमेदवार पुढे असताना त्यानंतर अचानक भाजप उमेदवार निवडून आले. त्यामुळे त्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. बंडखोरीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभाव झाला. 46 ते 55 यादरम्यान उमेदवार निवडून यायला हवे होते. बंडखोर तसेच अपक्षांना इतरांच्या तुलनेत अपेक्षापेक्षा जादा मते मिळाली. आघाडी केल्यामुळेही काही ठिकाणी भाजपला मते मिळाली, असेही आ. पाटील यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर खा.शरद पवार यांच्याबरोबर पोस्ट व्हायलर होत असून या बाबींना राष्ट्रवादीचा मिडिया सेल उत्‍तर देत नाही, असे विचारले असता ते म्हणाले, व्हॉट्सपवरुन कुणी काय पोस्ट टाकावी याला मर्यादा राहिलेली नाही. आंदोलने करणार्‍या सर्व समाजाला  आरक्षण मिळाले पाहिजे, अशीच भूमिका खा. शरद पवार यांची आहे. ओबींसींच्या आरक्षणाला धक्‍का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही भूमिका आहे. आगामी काळात भाजपविरोधात सक्षम पर्याय काँग्रेस-राष्ट्रवादी उभा करेल. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सद्यपरिस्थितीत निर्माण झालेल्या प्रश्‍नांची उत्तरे जनतेला देवून  आघाडी सरकार जनतेला काय देणार, हे लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केले जाईल. पूर्ण करता येतील अशीच आश्‍वासने जनतेला देवून सत्ता येताच ही आश्‍वासनांची पूर्ती केली जाणार आहे. शहरी नागरिकांनाही भाजप सरकार काही देवू शकलेले नाही. तरुणांना नोकर्‍या नाहीत. खोटा प्रचार मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. गोबेल्सनितीचा वापर केला जात आहे. त्याआड येणार्‍यांना आडवे करण्याची भाजपची निती आहे. 

आ. जयंत पाटील म्हणाले, शहरी भागातील वाढणार्‍या मतदारसंघांमध्ये भाजप आणि शिवसेनेची ताकद असली तरी शहरातील मतदारांना या पाच वर्षांत कळून चुकले आहे. त्यामुळे खोट्या प्रचाराला शहरी मतदार भुलणार नाहीत. त्यामुळे भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी आमचे एवढे येणार-तेवढे येणार असे सांगायचे कारण नाही. भाजपचे 50-60 पेक्षा जादा आमदार निवडून येणार नाहीत. हे गणित त्यांना मान्य नसल्यामुळे ते खोट्या वल्गना करत असतात, असा टोलाही आ. पाटील यांनी लगावला.

संविधान बदलून भाजपला मनुवाद आणायचाय

मराठा समाजाला आघाडी सरकारने दिलेल्या आरक्षणाची भाजपने अंमलबजावणी करावी. धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजांना आरक्षण देण्याचे दिलेले आश्‍वासन भाजपने पाळले नाही. भारतीय संविधान जाळण्याचे पाप त्यांनी केले. आरक्षणाला विरोध करणारे लोक दिल्‍लीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जाळल्याने भाजपची मनुवादी भूमिका जगासमोर आली. आम्ही संविधान बदलण्यासाठीच आलोय, असे वक्‍तव्य केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केले. म्हणजेच, भाजप पुन्हा मनुवाद आणण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप आ. जयंत पाटील यांनी केला.