Mon, Jun 24, 2019 21:04होमपेज › Satara › एमआयडीसीला दलालांचा विळखा घट्ट

एमआयडीसीला दलालांचा विळखा घट्ट

Published On: Jul 13 2018 12:51AM | Last Updated: Jul 12 2018 10:16PMतासवडे टोलनाका : प्रविण माळी

1994 ला तासवडे एमआयडीसीचा  खर्‍या अर्थाने विस्तार वाढला. मोठया प्रमाणात भूखंड वाटपास सुरूवात झाली. तेंव्हापासूनच एमआयडीसी दलालांच्या ताब्यात गेली ती आजअखेर तशीच आहे. अधिकार्‍यांचा त्यांच्यावर वरदहस्त आहे. 

एमआयडीसीची सुरूवात  झाल्यापासून दलाल आणि आधिकार्‍यांनी मिळून अनेक भूखंडाचे श्रीखंड विनासायास पचवले तरी अजुनही ढेकर काही आला नाही. आजही ते प्रकार सुरू आहेत. एमआयडीसीचे अधिकारी वेळोवेळी फक्त आश्‍वासनच देतात मात्र एमआयडीसीमध्ये मोकळे असणारे भूखंड उद्योजकांना का दिले जात नाहीत? आणि वर्षानुवर्षे अपुरी बांधकामे असलेल्या  बांधकामावर कारवाई का केले जात नाही, याचे कोडे सुटत नाही. 

एमआयडीसी सुरू झाल्यानंतर मोठे उद्योजक व छोटे उद्योजक अर्ज करू लागले. महामार्गालगत एमआयडीसी असल्याने मोठया प्रमाणात विस्तार वाढला.  तात्कालिन अधिकार्‍यांनी आपल्या जवळच्या मंडळींना अर्ज करण्यास सांगितले. या अधिकार्‍यांनी तासवडे एमआयडीसीचे महत्त्व ओळखले होते. त्यांनी आपल्या बगलबच्चानां अनेक भूखंड सहजासहजी मिळवून दिले. यातूनच एमआयडीसीमध्ये भूखंड दलालांचा कारभार सुरू झाला. तो आजही बिनदिक्कत सुरू आहे. 

आज एमआयडीसीमध्ये जे प्रामाणिक उद्योजक आहेत त्यांनी सर्व कागदपत्रांची पुर्तता करून भूखंड घेतले आणि भूखंड विस्तारकरणासाठी अर्ज केले. त्यांच्या फाईल प्रादेशिक विभाग कोल्हापूर या ठिकाणी कित्येक वर्षापासून धूळ खात पडून आहेत. एमआयडीसीत 55  मोकळे भूखंड आहेत. त्यासाठी अनेक स्थानिक व उद्योजकांनी सात वर्षापूर्वी मागणी अर्ज केले आहेत. तरीही त्यांना भूखंड मिळाले नाहीत. ज्यावेळी लिलाव होईल त्यावेळी तुम्हाला कळवले जाईल येवढेच उत्तर त्यांना मिळत आहे. लिलावाची गोष्टच न्यारी आहे. सहा महिन्यापूर्वी लिलाव झाला, पण पाच वर्षापूर्वी मागणी अर्ज केलेल्यांना याची माहितीच दिली गेली नाही .

एमआयडीसीमध्ये अनेक वर्षांपासून  अपुरी बांधकामे आहेत.   यावर एमआयडीसी कारवाई का करत नाही हा प्रश्‍न आहे. यामध्ये आर्थिक किंवा अन्य काही कारणांमुळे उद्योग सुरू न करू शकणारांची बांधकामे थोडी आहेत, पण बहुतांश बांधकामे ही दलालांची आहेत. एक एकाच्या नावावर चार- चार भूखंड आहेत. यातील काही जणांनी तर बांधकामे अपुरी असताना सुध्दा एमआयडीसीकडून इमारत पूर्णत्वाचा दाखला मिळवून तीन ते चार लाख रूपये प्रतिगुंठा इतक्या किमतींला विकून बक्कळ पैसे कमावले आहेत. अलिशान गाडयांसह यांचा वावर तासवडे एमआयडीसी मध्ये असतो. 

भूखंडातील घोळ, दलालांचा सुळसुळाट या प्रश्‍नावर दोन महिन्यापूर्वी एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी  आंदोलकांसोबत  बैठक घेतली. एका महिन्यात बेकायदा प्रकरणांवर कारवाई केली जाईल असे सांगितले गेले होते पण दोन महिन्यानंतर त्यावर काहीच झाले नाही.