Sun, Mar 24, 2019 09:00होमपेज › Satara › लक्झरीच्या धडकेत २ ठार

लक्झरीच्या धडकेत २ ठार

Published On: Jan 06 2018 1:26AM | Last Updated: Jan 05 2018 11:22PM

बुकमार्क करा
उंब्रज : प्रतिनिधी

पुणे-बंगळूर महामार्गावर एसटीच्या प्रतीक्षेत उभ्या राहिलेल्या चौघांना लक्झरीने जोरदार धडक दिल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी घडली. या भीषण अपघातात लक्झरी चालकासह महिला ठार झाली असून, तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

भागीर्थी आनंदा सोनावले (वय 57, रा. डेरवण, ता. पाटण) आणि महमद सलीम खान (वय 57, रा. बेळगाव) अशी ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. तर भागीर्थी सोनावले यांची सून सीमा अशोक सोनावले (वय 35), रोहित प्रदीप रामुगडे (वय 24, रा. चोरे, ता. कराड) आणि शुभम सुनील चव्हाण (वय 21, रा. उंब्रज, ता. कराड)  हे गंभीर जखमी झाले आहेत. त्याना उपचारासाठी कराड येथील कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लक्झरी बस (एमएच-03-सीपी-1473) ही मुंबईहून बेळगावकडे जात होती. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास लक्झरी चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर लक्झरीची उंब्रज येथे महामार्गावरील दोन महिलांसह तीन विद्यार्थ्यांना धडक दिली. तसेच लक्झरी दुभाजकाची लोखंडी रेलिंग उचकटून सुमारे पन्नास फूट पुढे गेली. भागीर्थी सोनावले आजारी असल्याने उपचारासाठी त्या सून सीमा सोनवले यांच्यासमवेत कोल्हापूरला निघाल्या होत्या. अपघातात गंभीर जखमी होऊन भागिर्थी सोनवले यांचा जागीचा मृत्यू झाला. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेत तातडीने मदतकार्य सुरू केले. लक्झरीतील सर्व 24 प्रवाशी हे बेळगाव परिसरातील असून ते हज येथे गेले होते. सुदैवाने बसमधील सर्व प्रवाशी सुखरूप आहेत.