Thu, Mar 21, 2019 11:44होमपेज › Satara › ‘लुंगी डान्स’प्रकरणाचे हायकोर्टात पडसाद

‘लुंगी डान्स’प्रकरणाचे हायकोर्टात पडसाद

Published On: Feb 09 2018 2:02AM | Last Updated: Feb 08 2018 10:10PMसातारा : प्रतिनिधी

सुरुची राडाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी न्यायाधीशांनी पोलिसांना धारेवर धरत एकूण कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्‍त केली. सातार्‍यातील लुंगी डान्सचे पडसाद उमटले असून याची हायकोर्टाने गंभीर दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांचा जाबजबाब घेण्याचे आदेश तपासी पोलिस अधिकार्‍यांना दिले आहेत. दरम्यान, सुरुची  राडा प्रकरणात मुख्य संशयितांना अद्याप अटक का केली नाही? त्यांच्यावर कोणती कारवाई केली? असा जाब विचारताच पोलिसांचे ‘त त प प’ झाले.

चार महिन्यांपूर्वी आनेवाडी टोल नाक्यावरून खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे कार्यकर्ते सातार्‍यातील सुरुची येथील बंगल्यासमोर भिडले. तोडफोड, जाळपोळ व फायरिंगसारखी घटना घडल्याने सातार्‍यात तणाव निर्माण झाला. मध्यरात्रीच्या सुमारास या घटनेने सातारकरांच्या काळजाचा धरकाप उडाला. या सर्व पार्श्‍वभूमीवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात एकूण तीन तक्रारी दाखल झाल्या. खासदार गटाच्या वतीने एक, आमदार गटाच्या वतीने एक व स्वत: पोलिसांच्या वतीने एक अशा एकूण तीन तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाल्या.

या सर्व तक्रारींमध्ये खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेेंद्रराजे भोसले यांच्या नावांचा थेट उल्‍लेख आहे. या सर्व प्रकरणात दोन्ही गटांकडून किमान दीडशे जणांचा सहभाग होता. गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी जुजबी कारवाई करत सुमारे 20 जणांना अटक केली. त्यातील सुमारे दहा ते 15 संशयित आरोग्य बिघडल्याचे कारण देत सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रिझन वॉर्डमध्ये तळ ठोकून राहिले. अटकेच्या या कारवाईनंतर हळूहळू दोन्ही गटाच्यावतीने अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयात तात्पुरत्या अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आले.

लुंगी डान्स प्रकरणाची सातारा जिल्हा न्यायालयाने गंभीर दखल घेत जामीन देताना संशयितांना जिल्हा बंदी घातली. याचवेळी उच्च न्यायालयात दोन्ही गटातील संशयितांच्या तात्पुरत्या जामीन अर्जावरही सुनावणी सुरु आहे. पोलिसांनी लुंगी डान्सचा अहवाल सातारा जिल्हा न्यायालयाबरोबरच मुंबई उच्च न्यायालयातही दाखल केला. बुधवारी तात्पुरत्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणीसाठी सातारा पोलिस गेले होते. यावेळी न्यायाधिशांनी पोलिसांवर तीव्र नाराजी व्यक्‍त केली. सुरुचि राडा प्रकरणात उर्वरीत संशयितांना अजून अटक का नाही? मुख्य संशयितांवर कोणती कारवाई केली? आता पुढे काय कारवाई करणार आहात? प्रिझन वॉर्डमध्ये लुंगी डान्स होत असताना पोलिस काय करत होते? मोबाईल आतमध्ये गेलेच कसे? संशयित आरोपी एवढ्या दिवस आजार कसे? संशयितांना नेमके काय झाले आहे? तत्काळ याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांचा जबाब घेवून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले.

मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी लुंगी डान्स प्रकरणामुळे पोलिसांवर ताशेरे ओढल्याने पोलिस गांगरुन गेले. दोन्ही गटातील समर्थकांच्या तात्पुत्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी लवकरच येत्या काही दिवसात संपणार असल्याने लुंगी डान्सचा यावर कोणता परिणाम होणार? याकडे आता जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.