Sun, Aug 18, 2019 14:47होमपेज › Satara › सातारा परिसरात वाढलेत ‘लव्हर्स पॉईंट’

सातारा परिसरात वाढलेत ‘लव्हर्स पॉईंट’

Published On: Feb 09 2018 2:02AM | Last Updated: Feb 08 2018 7:57PMसातारा : प्रतिनिधी

व्हॅलेटाईन डे जवळ आला म्हणून की काय सातारा व परिसरात ‘लव्हर्स पॉईंट’ वाढल्याचे चित्र आहे. सातारा परिसरातील चारभिंती, अजिंक्यतारा, यवतेश्‍वर घाट, कास, बामणोली, ठोसेघर, कुरणेश्‍वर आदि ठिकाणीही तरुणाई रेंगाळताना दिसत असून करिअरकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. प्रेमीयुगुलांचा अशा ठिकाणचा वावर वाढला असून काही महाविद्यालयीन युवक-युवती कॉलेजला दांडी मारून अशा ठिकाणी ‘गुलूगुलू’ अन् ‘इलू-इलू’ करत असल्याचे चित्र अनेकदा दिसू लागले आहे. दरम्यान, या प्रकाराने पालकांची चिंता वाढली असून त्यांनीच सजग राहण्याची गरज निर्माण झाली आहे. 

शाळा, कॉलेजच्या नावाखाली भलत्याच ‘क्लास’ला जाणार्‍या महाविद्यालयीन युवक-युवतींची संख्या वाढत आहे.  चारभिंती, अजिंक्यतारा, कुरणेश्‍वर या परिसरात तर अलिकडे युगुलांची संख्या लक्षणीय दिसू लागली आहे. सोबत आणलेली स्कूटी आडबाजूला अथवा सोयीच्या ठिकाणी लावून आपल्या मित्राबरोबर ‘लाँग ड्राईव्ह’ जाणार्‍या युवतींची संख्याही मोठी आहे.  या प्रकारांना पायबंद घालण्याऐवजी त्याचे उदात्‍तीकरण होत असल्याचेही पहायला मिळत असल्याने ही ‘वांड संस्कृती’ बरीच फोफावली आहे. 

शहर व परिसरात ओळखीपाळखीच्या लोकांचा असलेला वावर, युगुलांच्या भेटीच्या ठिकाणांवर पोलिसांच्या पडणार्‍या रेड आणि घरच्यांच्या भीतीपोटी युगुलांकडून नव्या ठिकाणांचा शोध घेतला जावू लागला आहे. पण झपाट्याने होणार्‍या शहरीकरणामुळे प्रेमीयुगुलांना जग अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे आता पवित्र समजल्या जाणार्‍या मंदिरातही  अशी ‘जोडपी’ सहजगत्या आढळून येतात. पण त्याठिकाणीही कोणीतरी ओळखीचा भेटण्याची शक्यता असते. 
 परिणामी सुरक्षित ठिकाणे निवडली जात आहेत. कोपर्‍यात सहसा कोण जात नसल्याने युगुलांच्या बर्‍याचदा बिनधास्त गाठीभेटी होत आहेत. भिंतीचा आडोसा घेवून गळ्यात गळे घालून ‘इलू-इलू’ करणार्‍यांची  संख्या वाढली आहे.