Thu, Aug 22, 2019 08:14होमपेज › Satara › म’श्‍वरमधील लॉडविक पॉईंट येथे वणवा

म’श्‍वरमधील लॉडविक पॉईंट येथे वणवा

Published On: Jan 19 2018 1:58AM | Last Updated: Jan 18 2018 10:20PMमहाबळेश्‍वर : वार्ताहर  

जगप्रसिध्द पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या महाबळेश्‍वरमध्ये बुधवारी वणवा पेटल्याची घटना घडली. शहरापासून जवळच असणार्‍या लॉडविक पॉईंट येथे पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाने सिगारेट पिऊन झुडपांमध्ये टाकली. दुपारी उन्हाची तीव्रता जास्त असल्याने या सिगारेटच्या ठिणगीमुळे मोठा वणवा पेटला. या वणव्यामध्ये सुमारे 5 किमी परिसरातील झाडे झुडपे जळून भस्मसात झाली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनरक्षक रोहित लोहार, दीपक चोरट यांनी जीवाची बाजी लावून वणवा जास्त भडकू नये यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

थंड हवेचे निसर्गरम्य पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्‍वर येथील प्रसिद्ध लॉडविक पॉईंट येथे बुधवारी दिवसभर पर्यटकांची गर्दी होती. या पॉईंटवरून सायंकाळी सूर्यास्ताचे मनोहरी दृश्य पहायला मिळते. हा सूर्यास्त आपल्या कॅमेरात व मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात. याच पॉईंटवर बुधवारी दुपारी पर्यटनासाठी आलेला एक पर्यटक धूम्रपान करत होता. धूम्रपान केल्यानंतर या पर्यटकाने सिगारेट पिऊन झाल्यानंतर त्या सिगारेटचे थोटूक खाली टाकले. कडक उन्हामुळे याची ठिणगी झाडाझुडपात पडली असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला.

काही वेळातच या सिगारेटच्या थोटकामुळे आग भडकल्याने मुख्य लॉडविक पॉईंट व परिसरातील तब्बल पाच किलोमीटर परिसरातील झाडे झुडपे  जळून भस्मसात झाली. वनविभागाच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांच्या दोन -तीन तासांच्या अथक प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणली.  सहा वनसंरक्षक व्ही. व्ही. परळकर, वनक्षेत्रपाल रणजित गायकवाड, वनपाल एस. बी. नाईक घटनास्थळी उपस्थित होते. 

दरम्यान, लॉडविक पॉईंट येथे तीव्र उतार व दरी आहे. असे असतानाही जीवाची बाजी लावून रोहित लोहार व दीपक चोरट यांनी वणवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत आग भडकू नये यासाठी प्रयत्न केल्यामुळे आगीने जास्त रौद्र रूप धारण केले नाही. या कार्यामुळे या दोघांचे पर्यटक व वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी कौतुक केले. ज्या पर्यटकाने सिगारेट पिऊन टाकली त्याच्या विरोधात भारतीय वन अधिनियमनुसार आग लावण्याबाबत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वनक्षेत्रपाल रणजित गायकवाड यांनी दिली.