Tue, Apr 23, 2019 23:30होमपेज › Satara › रिक्षाचालकाकडून सिगारेटचे चटके देऊन लूटमार

रिक्षाचालकाकडून सिगारेटचे चटके देऊन लूटमार

Published On: Apr 20 2018 1:19AM | Last Updated: Apr 19 2018 10:45PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यात रिक्षाचालकाने प्रवाशाला सिगारेटचे चटके देऊन मारहाण करत लूटमार केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. एमआयडीसी परिसरात संशयित रिक्षाचालकाने रोख रक्‍कम जबरदस्तीने चोरली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

आकाश शिवदास असे संशयित रिक्षाचालकाचे नाव असून याप्रकरणी नीलेश बबन भोसले (वय 36, निगडी, ता. सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार नीलेश भोसले हे सध्या एमआयडीसीमध्ये काम करत आहेत. दि. 18 रोजी ते रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दुचाकीने बाँबे रेस्टॉरंट परिसरात निघाले होते. त्यावेळी अचानक त्यांची दुचाकी बंद पडली. त्यामुळे त्यांनी एटीएममधून 10 हजार रुपये काढले. दुचाकी दुरुस्तीसाठी मॅकेनिक शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्रीची वेळ असल्याने मेकॅनिक सापडला नाही. अखेर दुचाकी लावून त्यांनी रिक्षातून जाण्याचा निर्णय घेतला. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास रिक्षामधून जात असताना संशयित आरोपी रिक्षा चालकाने बिअरची बाटली घ्यायची असल्याचे सांगून तक्रारदार यांच्याकडून भाड्याचे पैसे मागितले. यावेळी तक्रारदार यांनी 10 हजार रुपयांमधील भाड्याचे ठरलेले पैसे दिले.

तक्रारदार व रिक्षा चालक पुन्हा रिक्षातून जात असताना रिक्षा चालकाने अचानक रस्ता बदलला व एमआयडीसी येथील निर्जनस्थळी रिक्षा नेली. दमदाटी व शिवीगाळ करत संशयिताने 8 हजार 500 रुपये जबरदस्तीने हिसकावले. धक्‍कादायक बाब म्हणजे यावेळी संशयिताने सिगारेटने चटकेही दिले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, संशयित आरोपी याने पैसे घेतल्यानंतर तक्रारदार यांना अंधारामध्ये ढकलून देवून तेथून पळ काढला.

तक्रारदार निलेश भोसले यांनी मंगळवारी सकाळी शहर पोलिस ठाण्यात धाव घेवून घडलेल्या घटनेबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, रिक्षा चालकाच्या या कृत्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.