Fri, Jul 19, 2019 01:16होमपेज › Satara › डेंग्यूच्या नावाखाली रुग्णांची लूट?

डेंग्यूच्या नावाखाली रुग्णांची लूट?

Published On: Dec 03 2017 1:03AM | Last Updated: Dec 02 2017 10:41PM

बुकमार्क करा

फलटण : प्रतिनिधी

फलटण तालुक्यात रुग्णांच्या अज्ञानाचा फायदा घेत डेंग्यूच्या नावाखाली गोरगरीब रुग्णांची लुट सुरू असून विविध रक्ताच्या तपासणी करण्यास रुग्णास भाग पाडले जात आहे. त्यामुळे रुग्णास बळीचा बकरा बनवून लुटण्याचा हा गोरखधंदा शासकीय वैद्यकीय अधिकार्‍यांनी भरारी पथकांद्वारे कारवाई करून थांबवावा, अशी मागणी होत आहे. 

फलटण तालुक्यात सध्या सर्दी, खोकला, थंडी, तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. अनेक ठिकाणी दवाखाने फुल्ल भरले आहेत. थंडी तापाची अनेक लक्षणे असू शकतात शिवाय रक्तातील प्लेटलेटदेखील अनेक कारणांनी कमी जास्त होऊ शकतात. परंतु, डेंग्यूच्या साथीमुळे धास्तावलेल्या रुग्णांना भीती दाखवून अ‍ॅडमिट करण्यास भाग पाडले जात आहे. गरज नसताना विविध तपासण्या करण्यास सांगितले जात आहे. गरज नसताना सलाईन, अँटिबायोटिक हाय्यर इंजेक्शन गोळ्या देऊन त्याच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी होऊ लागल्या आहेत. हाय्यर डोसमुळे पेशंटला रिअँक्शन आल्यास त्याच्या जीवाशी खेळ होवू शकतो, याची जाणीव असूनही अशाप्रकारे औषोधोपचार सुरु असल्याचे दिसून येत आहे.

डेंग्यू आजार झाला की नाही हे अधिकृत मान्यताप्राप्त पॅथालॉजीमधून रक्ताची तपासणी एलिसा टेस्ट केल्यानंतरच समजते. अन्य  तपासणीची गरज नसते. तरीही अनेक पेशंटच्या खिशाला कात्री लागत आहे. संबंधित रुग्णाला लॅबधारकांकडून रिपोर्ट दिला जात नाही. त्यामुळे संशयला निश्‍चितपणे जागा राहते. वैद्यकीय अधिकार्‍यांनी भरारी पथक नेमून दवाखान्यांना अचानक भेटी देऊन तपासणी करावी व दोषींवर त्वरीत कारवाई करावी, अशी नागरिकातून मागणी होत आहे.

दरपत्रकानुसार रक्कम आकारणी आवश्यक

शासनाने खाजगी दवाखान्यात दर्शनी बाजूस डेंग्यू तपासणी फी 600 रुपये आकारावी, असे परिपत्रिक काढले आहे. बहुतांशी दवाखान्यांनी दवाखान्यात साधे दरपत्रकही लावले नाही. तरीही कोणावरही अजून कारवाई केली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.