Thu, Jun 27, 2019 13:40होमपेज › Satara › शाळांकडून होतेय पालकांची लूट

शाळांकडून होतेय पालकांची लूट

Published On: Jan 23 2018 1:12AM | Last Updated: Jan 22 2018 8:43PMसातारा : मीना शिंदे

शिक्षणापासून एकही बालक वंचित राहू नये, शिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी शासन प्रयत्नशील असले तरी अनेक खासगी शैक्षणिक संस्था व शाळांमध्ये पालकांची लूट होत असल्याच्या तक्रारी आहेत. सातारा जिल्ह्यातील अनेक शाळांमधून विविध कारणे सांगून शाळा व्यवस्थापन ना-ना प्रकारचे  शैक्षणिक शुल्क आकारले जात आहे. एवढेच काय बारावीपर्यंत मुलींना पूर्णपणे शैक्षणिक फी माफ असतानाही अनेक शाळा बेकायदेशीरपणे फी आकारत आहेत. मुलांची शिक्षणामध्ये हेळसांड होऊ नये यासाठी पालक वर्ग मात्र लूट होऊनही तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत असल्याचे चित्र आहे.

सातारा जिल्ह्यातील शैक्षणिक जगतात खासगी शाळांचे पेव चांगलेच फुटले आहे. एकीकडे प्रतिकूल परिस्थितीतही जिल्हा परिषद शाळा गुणवत्तेत अग्रेसर राहू लागल्या आहेत. असे असतानाही पालकांचा मात्र खासगी शाळांकडे कल आहे. माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील  पालक वर्गाकडून शाळांबाबत तक्रारींचा सूर उमटत आहे. काही शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन आपला लौकिक कायम ठेवत असल्या तरी अशा शाळांची संख्या अत्यल्प आहे.

त्या तुलनेत विविध शैक्षणिक शुल्क आकारून पालकांची लूट करणार्‍या शाळा व शैक्षणिक संस्थांची संख्या अधिक असल्याचे वास्तव आहे.  शालेय गणवेश, स्पोर्ट ड्रेस व इतर शैक्षणिक साहित्य शाळेतूनच किंवा  ठराविक  दुकानातूनच खरेदीची सक्ती शैक्षणिक संस्थांच्यावतीने केली जात आहे. यातून  खरेदी केलेले साहित्य व कपड्यांचा दर्जा आणि किंमत यांच्यात तफावत जाणवत असून शाळा व पुरवठा करणारे दुकानदार यांचे साटेलोटे  असल्याचे पालकांकडून उघडपणे बोलले जात  आहे. अमक्या दुकानातूनच गणवेश खरेदी करावेत, तमक्या दुकानातूनच स्पोर्ट ड्रेस, शूज खरेदी करावेत. असा फतवाच शाळा व्यवस्थापन काढत असल्यामुळे पालकांना तोंड  दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. शाळेच्या जबरदस्तीमुळे  दुकानदारांचे मात्र उखळ पांढरे होत आहे. 

प्रत्येक शाळांचा गणवेश हा दर दोन ते तीन वर्षांनी बदलत असल्याने जे विद्यार्थी शाळेत येवून एक वर्ष झाले आहे, अशांना लगेचच नवीन गणवेशाचा भुर्दंड बसत आहे. एक गणवेश साधारण दोन वर्ष टिकतो. त्यामुळे  नवीन गणवेश घेतल्यावर लगेच दुसर्‍यावर्षी तो बदलल्याने जुना गणवेश पडून राहतो.  आर्थिक जुळवाजुळव करुन महिना चालवणार्‍या कुटुंबास हा मोठा भुर्दंडच बसतो.  

सध्या सर्व शाळांमध्ये क्रीडा सप्ताहांचे आयोजन करण्यात येत आहे.  यासाठी एकसारखेपणा दिसावा, यासाठी स्पोर्ट ड्रेस सर्व शाळा  बंधनकारक करत आहेत. अशा अनेक पद्धतीने पालकांची लूट केली जात आहे. याबाबत मोठ्या तक्रारी असूनही केवळ मुलांच्या भवितव्यासाठी पालक वर्ग ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ अशा भूमिकेत दिसून येत आहेत.

मुलींची फी आकारणार्‍या शाळांवर कारवाई करा...

शासनाने बारावीपर्यंत मुलींना शैक्षणिक फी पूर्णपणे माफ केली आहे. असे असतानाही सातारा शहरातील काही नामांकित संस्थांच्या शाळा मुलींच्या पालकांकडून फी आकारत आहेत. संगणक फी, स्टेशनरी फी अशा अनेक फीच्या नावाखाली मुलींचे शैक्षणिक शुल्क या शाळा आकारत आहेत. याबाबत शहरातील पालकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या असून संघटीतरित्या आवाज उठवण्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, ज्या शाळा मुलींची बेकायदेशीरपणे शैक्षणिक फी घेत आहेत, शासन निर्णयाला कोलदांडा देत आहे अशा शाळांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.