Tue, Mar 26, 2019 12:19होमपेज › Satara › शिक्षकांचा २९ एप्रिलला लाँग मार्च

शिक्षकांचा २९ एप्रिलला लाँग मार्च

Published On: Apr 19 2018 1:37AM | Last Updated: Apr 18 2018 8:55PMउंडाळे : प्रतिनिधी 

प्राथमिक शिक्षकांवरील अन्यायाविरूद्ध प्राथमिक शिक्षक संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. बदली धोरणात दुरूस्ती करण्यासह नवीन सर्वसमावेश धोरण राबवण्यासाठी 29 एप्रिलला ‘लाँग मार्च’ काढण्यात येणार आहे. गोपीनाथगड ते वैजिनाथ मंदिरापर्यंत हा लाँग मार्च काढला जाणार असल्याची माहिती बाळकृष्ण तांबारे  व सातारा  जिल्हा  अध्यक्ष महेंद्र जानुगडे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्‍नांवर चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची राज्यस्तरीय महामंडळ सभा मंगळवार, 17 एप्रिलला पुणे येथे शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, कार्याध्यक्ष अंबादास वाजे, सरचिटणीस आप्पासाहेब कुल, एन. वाय. पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत पार पडली. 27 फेब्रुवारी 2017 च्या शासन निर्णयाद्वारे राज्य शासनाने प्राथमिक शिक्षकाचे बदली धोरण जाहीर केले आहे. या बदली धोरणात अनेक त्रुटी असुन या त्रुटीमुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा विस्कळीत होणार असून सर्वसामान्य जनतेच्या मुलांना शिक्षण देण्यात अडथळे निर्माण होणार आहेत. या बदली धोरणात कोणतीही टक्केवारी नसल्यामुळे राज्यातील 90 टक्के शिक्षक बदली पात्र ठरले आहेत. बदल्या सेवाजेष्ठता डावलून होणार असल्याने सेवाकनिष्ठ शिक्षकांवर अन्याय होत आहे. या सर्वाचा शैक्षणिक गुणवत्तेवर प्रतिकुल परिणाम होणार आहे. 

प्रशासकीय व विनंती बदलीत फरक केलेला नाही. 10 वर्षे सेवा झालेला प्रत्येक शिक्षक बदली पात्र ठरला आहे. प्रत्येक शिक्षकांची प्रत्येक वर्षी बदली होणार आहे. एखाद्या शाळेतील शंभर टक्के शिक्षकांच्या बदल्या झाल्यास ती शाळा पूर्णपणे विस्कळीत होणार आहेत. 

13 नोव्हेंबर 2017 चा जाचक शासन निर्णय रद्द करावा,  जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणार्‍या इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या 100 टक्के विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात यावा. संगणक प्रशिक्षणाची मुदत वाढवून होणारी वसुली तात्काळ थांबवावी.  30 सप्टेंबर 2017 च्या पटसंख्येनुसार पद निश्‍चिती करूनच समायोजनाची प्रक्रिया राबवावी,.प्रत्येक शाळेला मुख्याध्यापक व समाजिकशास्त्र विषयाचा पदवीधर शिक्षक देण्यात यावा. पटसंख्येअभावी  बंद केलेल्या शाळा सुरू करण्यात याव्यात.या सर्व मागण्यांसाठी 29 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता रोजी परळी येथील गोपीनाथगड ते वैजिनाथमंदिर लाँगमार्च मोर्चा काढण्याचा एकमताने निर्णय घेतल्याचे तांबारे यांनी सांगितले. पुण्यातील सभेस राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी  35 जिल्हाध्यक्षासह राज्यातील 2 हजार शिक्षक उपस्थित होते.