Fri, Apr 26, 2019 18:20होमपेज › Satara › लोणंदला दि. २३ पासून राज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शनाचे आयोजन

लोणंदला दि. २३ पासून राज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शनाचे आयोजन

Published On: Dec 08 2017 1:43AM | Last Updated: Dec 07 2017 10:57PM

बुकमार्क करा

लोणंद : प्रतिनिधी

माजी केंद्रीय कृषि मंत्री खा. शरद पवार यांच्या संसदीय कायदेमंडळातील कारकिर्दीस पाच दशके पूर्ण झाल्याबद्दल लोणंद येथील सुवर्णगाथा उत्सव समिती, साद सोशल ग्रुप, विकासधारा मंच, राज्य शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद आणि लोणंद बाजार समिती यांच्यावतीने दि. 23 ते 27  दरम्यान लोणंद बाजार समिती आवारात राज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोणंद बाजार समितीच्या आवारावर दि. 24 रोजी दुपारी 12 वाजता या पाच दिवसीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन खा. शरद पवार यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. प्रदर्शनात अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान, कृषी संशोधन, कृषी अवजारे, पशुपक्षी प्रदर्शन, यंत्रे, वाहने आदींचे सुमारे 350 स्टॉल सहभागी होणार आहेत.

याबाबत विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर, आ. मकरंद पाटील, जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजकांच्यावतीने प्रदर्शनाची रुपरेषा निश्‍चित केली असून तयारी सुरु केली आहे. दरम्यान, प्रदर्शनाच्या पहिल्या माहिती-पत्रकाचे प्रकाशन संजीवराजे ना.निंबाळकर यांच्या हस्ते सातारा येथे झाले. यावेळी कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मनोज पवार, जिल्हा कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, सी. जी. बागल, डॉ.विनोद पवार आदी अधिकारी तसेच ‘सुवर्णगाथा’चे  निमंत्रक डॉ. नितिन सावंत, योगेश क्षीरसागर, हणमंत शेळके-पाटील, गजेंद्र मुसळे,  सागर शेळके, रविंद्र क्षीरसागर उपस्थित होते.

दुष्काळी खंडाळा तालुक्यात 1980 च्या दशकात लोणंदच्या मालोजीराजे विद्यालयाच्या पटांगणावर रोटरी क्लबने कृषी प्रदर्शन भरवले होते. त्यानंतर तब्बल 35 वर्षांनी धोम - बलकवडी व निरा - देवघरचे पाणी तालुक्यात फिरल्यानंतर कृषी प्रदर्शन होत आहे. कृष्णाकाठच्या यशवंत कृषी प्रदर्शनानंतर निरा काठीही भव्य शरद कृषी प्रदर्शन होत असल्याने जिल्ह्याच्या उत्तरेकडील खंडाळा, फलटण, वाई, कोरेगाव तालुक्यांबरोबर पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, भोर आदी  भागातील शेतकर्‍यांना याचा लाभ होणार आहे.