Tue, Apr 23, 2019 01:36होमपेज › Satara › बेवारस धरणाला अखेर मिळाला मालक

बेवारस धरणाला अखेर मिळाला मालक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

लोणंद : शशिकांत जाधव

लोणंद-खेड बु.च्या सीमेवर असणारे तुळशी वृदांवन धरण अनेक वर्ष शासकीय पातळीवर कोणतेच खाते जबाबदारी घेत नसल्याने बेवारस असल्याची स्थिती बनली होती. अखेर याबाबत सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळून ना. गिरीश महाजन यांच्या आदेशानुसार लघुपाटबंधारे खात्याच्या रूपाने तात्पुरता का होईना धरणाला मालक मिळाला आहे. यामुळे शेवटची घटका मोजत असणार्‍या धरणाची दुरुस्ती होवून आयुष्यमान वाढण्यासह पोट-पाटाचे पाणी शेतीला मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

लोणंद व खेड बु. गावच्या सरहद्दीवर 1972च्या सुमारास तत्कालीन आ. कै. डॉ. कृष्णचंद्र भोईटे व जि. प. सदस्य कै. नामदेवराव घाडगे यांच्या प्रयत्नातुन तुळशी वृदांवन धरण उभारण्यात आले होेते. धरणामुळे खेड, लोणंद, बाळु पाटलाची वाडी या भागातील शेकडो एकर जमीन ओलिताखाली आली. धरणाला असणार्‍या फाट्याच्या पाण्याने दगड वस्ती, पांढर मळा लोणंद  या भागातील शेती भिजू लागली. परंतु, काही वर्षापासून कमी पर्जन्य व धरणाच्या वरच्या बाजूला बंधारे झाल्याने पुरेसा पाणी साठा न होवून धरण कोरडे पडत होते.

त्यामुळे धरणाच्या भरावावर झाडे उगवून भिंतीला चिरा पडल्या. त्यातच धरणाच्या मालकीचा प्रश्‍न निर्माण होऊन कोणतेच खाते धरण आपल्या ताब्यात असल्याचे कागदोपत्री व तोंडीही  सांगत नव्हते. 
धोम-बलकवडीचे पाणी खंडाळा तालुक्यात आल्यानंतर काही वर्षापासून धरणाच्या मालकीचा व दुरुस्तीचा प्रश्‍न निर्माण झाला होता. गेल्या दहा-बारा वर्षामध्ये धरणाची मालकी कोणत्या खात्याकडे आहे, हे शोधण्याबरोबर दुरुस्तीसाठी माजी जि. प. सदस्य स्व. अविनाश धायगुडे - पाटील, आनंदराव शेळके-पाटील, माजी सभापती विनोद क्षीरसागर, रमेश धायगुडे-पाटील, उपसभापती वंदनाताई धायगुडे-पाटील, माजी पं. स. सदस्य बापूराव धायगुडे आदींनी शासकीय पातळीवर याबाबत पाठपुरावा केला. परंतु, लालफितीच्या कारभारात अडकलेले तुळशीवृदांवन धरणाचे दोन खात्यामधील हस्तांतर पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे शासन पातळीवर त्याला मालकच नव्हता.

दरम्यान, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद क्षीरसागर व ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष अनिल कुदळे यांनी जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांना निवेदन देऊन त्याचा सातत्याने पाठपुरावा करून तुळशी वृदांवन धरणाची शासकीय मालकी निश्‍चित करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यास यश येवून धरणाची सध्या देखभाल दुरुस्ती व सिंचन जबाबदारी लघु पाटबंधारे विभागाने करावयाची आहे. याबाबतचे आदेश जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांनी दिले आहेत. त्यानुसार नुकतीच लोणंद येथे  अधिकारी व शेतकर्‍यांची बैठक पार पडली. गेल्या अनेक वर्षापासुन बंद झालेला पाणी फाटा पुन्हा सुरू झाल्यास शेकडो एकर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. त्यासाठी आता पाठपुरावा करण्याची गरज आहे.
 

 

 

 

tags ; tulshi,news, Vrindavan Dam Responsibility laghupatabandhare Department 


  •