होमपेज › Satara › पाळणे उभारणीवर अखेर अंकुश

पाळणे उभारणीवर अखेर अंकुश

Published On: Aug 14 2018 1:05AM | Last Updated: Aug 14 2018 12:27AMलोणंद : प्रतिनिधी

लोणंदच्या पालखी तळावरील लोणंद नगरपंचायतीच्या जागेत विनापरवाना सुरू असलेले पाळणे, खेळ व मनोरंजनाचे खेळणी साहित्य उभारणीचे काम तात्काळ बंद करावे. सदर जागेतील साहित्य त्वरीत हलवावे अन्यथा नगरपंचायतीकडून हे साहित्य जप्‍त करण्यात येईल, अशी नोटीस पाळणे उभारणी मालकांना देण्यात आली आहे. त्यामुळे आज पोलिस बंदोबस्तात पाळणे काढण्याची  ही कारवाई केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी यांनी सांगितले.  या निर्णयाचे लोणंदकरांनी स्वागत केले आहे.

लोणंद येथील बाजार तळावर विना परवाना पाळणे, मौत का कुवा अशा करमणुकीच्या खेळांची उभारणी गेल्या तीन-चार दिवसांपासुन सुरू होती. या पाळणा उभारणीला नगरपंचायत, पोलिस, महसुल या तिन्ही विभागांच्या परवानगी दिलेली नसतानाही पाळणा जोडण्याचे काम सुरू होते. याबाबत दै.‘पुढारी’ने प्रथम आवाज उठवला होता. त्यानंतर लोणंद नगरपंचायतीने याची दखल घेतली आहे. 

सोमवारी दुपारी काढलेल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे की, लोणंद येथील बाजार तळावर पाळणे, खेळणी लावण्यासाठी विशाल ज्ञानेश्‍वर डोंबे रा. लोणंद यांनी अर्ज दिला होता. परंतु, अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडली नसल्याने त्यांची परवानगी नाकरण्यात आली होती. त्याचबरोबर लोणंद नगरपंचायतीच्या जागेत विनापरवाना सुरू केली असलेली पाळणे, खेळ उभारणी तात्काळ बंद करावी. नगरपंचायतीच्या जागेतील साहित्य हलवून जागा रिकामी करण्याची कार्यवाही तात्काळ करावी. सदरचे साहित्य काढून न घेतल्यास नगरपंचायत मार्फत साहित्य काढण्यात येऊन जप्त करण्यात येईल. यामध्ये होणार्‍या नुकसानीस तुम्ही जबाबदार धरले जाईल. सदरचे साहित्य स्वःतहून काढले नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे. 

संबधित पाळणा चालकाने साहित्य स्वःतहून काढले नाही. तर लोणंद नगरपंचायतीच्यावतीने साहित्य काढण्यासाठीची कारवाई सुरू करण्याचे कर्मचार्‍यांच्या आदेश दिले जातील. पोलिस बंदोबस्तात पाळणे काढण्यात येउन साहित्य जप्त केले जाईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या ठिकाणची पाळणा उभारणी केली जात असताना शनिवार व रविवार या दोन दिवशी शासकीय सुट्टी आल्याने समज गैरसमज निर्माण झाले होते. त्यानंतर सोमवारी  नगरपंचायत  प्रशासनाच्यावतीने पाळणे काढण्यासाठी ठोस पाऊले उचलण्यात आली आहेत.

लोणंदच्या बाजार तळावरील पाळण्यांना परवानगी नाकारण्यात आली असल्याचे पत्र खंडाळा तहसिलदार व लोणंद पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे. त्यामुळे मांढरदेव दुर्घटनेनंतर 14 वर्ष लोणंद शहरात पाळण्यांना असलेली बंदी कायम राहण्याची राहणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. सोमवारी दुपारी डोंबे यांना साहित्य काढण्यासाठी नोटीस दिल्यानंतरही सायंकाळपर्यंत पाळणा उभारणीचे काम जैसे ठेवले होते. त्यामुळे लोणंद नगरपंचायत प्रशासनाने पाळणे साहित्य हलविण्यासाठी मंगळवारी सकाळी 11.30 ची वेळ निश्‍चित केली  आहे. त्यासाठी कर्मचार्‍यांना आदेशही देण्यात आले आहे. 

पोलीस बंदोबस्तासाठी लोणंद पोलिस स्टेशनला पत्र देण्यात आले आहे.तर या कारवाईचे व्हीडीओ चित्रीकरण करण्यासाठी ही साठीही पत्र देण्यात आहे. त्यामुळे मुख्याधिकारी यांनी बेकायदेशीर पाळणे हटविण्यासाठी ठोस पाऊले उचलल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.