लोणंद/मिरज : प्रतिनिधी
मिरज-पुणे रेल्वेमार्गावर सातारा जिल्ह्यातील सालपे व आदर्की स्थानकांत सिग्नलची वायर कापून कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस आणि लोकमान्य टिळक टर्मिनन्स (एलटीटी)-हुबळी एक्स्प्रेस 10 ते 12 दरोडेखोरांनी लुटण्याचा प्रयत्न रविवारी मध्यरात्री केला. यामध्ये काही प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरीस गेल्या आहेत.
एकाच दिवशी तीन एक्स्प्रेस गाड्या लुटण्याचा प्रयत्न झाल्याने सुरक्षा यंत्रणेची झोप उडाली आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोल्हापूरहून मुंबईला निघालेली महालक्ष्मी एक्स्प्रेस व सह्याद्री एक्स्प्रेस सालपे स्थानकाजवळील आउटर सिग्नलची वायर कापून दरोडेखोरांनी लुटण्याचा प्रयत्न केला. गाडी थांबताच काही खिडक्यांमधून आत हात घालून दरोडेखोरांनी दागिने हिसकाविण्याचाही प्रयत्न केला. एका दरोडेखोराने गाडीतील एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसडा मारुन तोडले. परंतु ते मंगळसूत्र महिलेच्या गळ्यातून तुटून गाडीतच पडले.
या गाडीला आरपीएफचा बंदोबस्त असल्याने गाडी थांबताच आरपीएफ जवानांनी प्रवाशांना सावधान करुन दरवाजे बंदच ठेवण्याचे आवाहन केले. गाडीतील व स्थानकातील ड्युटीवरील आरपीएफ जवान एम. ए. मोरे आणि राकेश कुमार या दोघांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला. त्यामुळे दरोडेखोरांनी शेजारील उस व बाजरीच्या पिकातून पळ काढला. त्यामुळे दरेडोखोरांचा तीन एक्स्प्रेस गाड्या लुटण्याचा प्रयत्न फसला. या घटनेनंतर सातारा आरपीएफ, मिरज रेल्वे पोलिस, मिरज आरपीएफ आणि लोणंद पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी दरोडेखोरांना शोधण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पुणे आरपीएफचे उपअधीक्षक मकरारीया यांनी भेट देऊन पाहणी केली.
सालपे स्थानकापुढील स्थानक आदर्की येथे लोकमान्य टिळक टर्मिनन्सहून हुबळीकडे निघालेली एक्स्प्रेसही सिग्नलची वायर कापून अडविण्यात आली. दरोडेखोरांनी येथेही प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न केला. या गाडीतील बेळगाव येथील एका प्रवाशास दरोडेखोरांनी लुटले आहे. या गाडीस मात्र कोणत्याही प्रकारचा बंदोबस्त नसल्याने गाडी किती वेळ थांबली व किती प्रवाशांना लुटले हे मात्र समजू शकले नाही. परंतु बेळगाव येथील त्या प्रवाशाने बेळगाव रेल्वे पोलिसात तक्रार दिल्याचे सांगण्यात आले.
सालपे, आदर्की स्थानका जवळ सिग्नलची वायर कापून कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस, एलटीटी-हुबळी एक्स्प्रेस लुटण्याचा प्रयत्न झाल्याबाबत सातारा येथील आरपीएफ ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
रेल्वेत अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा सुळसुळाट
कोल्हापूरहून मुंबईकडे जाणार्या आणि मुंबईहून मिरज, कोल्हापूर आणि कर्नाटककडे जाणार्या एक्स्प्रेस गाड्या मध्यरात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास पुणे-सातारा दरम्यान येतात. काही ठराविक एक्स्प्रेस गाड्यांनाच आरपीएफचा बंदोबस्त आहे. तर काही गाड्यांना बंदोबस्तच नाही. ही संधी साधून सिग्नलची वायर कापून एक्स्प्रेस गाड्या लुटण्याचा प्रयत्न होतो. रविवारी मध्यरात्री एकाचवेळी महालक्ष्मी एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस आणि हुबळी एक्स्प्रेस लुटण्याचा प्रयत्न झाल्याने सुरक्षा यंत्रणेची झोप उडाली आहे. रेल्वे गाड्यांमध्ये तसेच स्थानकामध्ये अवैध खाद्य पदार्थ विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. अनेकवेळा तक्रारी होवूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. यापुढे तरी रेल्वे गाड्यातील अवैध विक्रेत्यांचा बंदोबस्त होणार का? असा प्रश्न प्रवाशांतून उपस्थित होत आहे.