Wed, Sep 19, 2018 20:52होमपेज › Satara › रस्त्याकडेला फेकलेल्या अर्भकाला जीवदान

रस्त्याकडेला फेकलेल्या अर्भकाला जीवदान

Published On: Jul 28 2018 1:41AM | Last Updated: Jul 27 2018 7:35PMपाटण : प्रतिनिधी

पहाटे पाचच्या सुमारास नवजात अर्भकाला जन्मदातीने पाटण शहरातील साळुंखे हायस्कूल परिसरातील झुडपात टाकले. पाऊस सुरू होता. दिड-दोन तास त्या नवजात बालिकेची जगण्याची धडपड सुरू होती. नगरसेवक सचिन कुंभार यांनी सहकार्‍यांसह वैद्यकीय व पोलिस अधिकार्‍यांनी त्या अर्भकाला जीवदान दिले. 

गुरुवारी पहाटे  साळुंखे हायस्कूल परिसरातील झुडपात नवजात अर्भकाला टाकून जन्मदातीने पळ काढला होता. मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असताना भर पावसात जन्मदातीने तिला उघड्यावर टाकले. सूर्योदय झाल्यानंतर याची माहिती झाली. येथे बघ्यांची गर्दी वाढली. भर पावसात उघड्यावर त्या अर्भकाची जगण्यासाठीची धडपड सुरू  होती. याच प्रभागाचे नगरसेवक सचिन कुंभार यांना याची माहिती मिळताच ते सहकार्‍यांसह तेथे पोहोचले. दरम्यान ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत यादव, सहाय्यक पोलिस निरीक्षक उत्तमराव भापकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. रघुनाथ नांगरे हे ही त्या ठिकाणी दाखल झाले. सचिन कुंभार व सहकार्‍यांनी  अर्भकाला कपड्यात गुंडाळून ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉ. यादव, डॉ. नांग यांनी अथक परिश्रम घेत अर्भकाला जीवदान दिले. त्याला पुढील उपचारासाठी सातारा सिव्हिल हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.