Thu, Apr 25, 2019 16:03होमपेज › Satara › महामार्गालगतचे डिव्हायडर व्यावसायिकांनी मुजवले 

महामार्गालगतचे डिव्हायडर व्यावसायिकांनी मुजवले 

Published On: Feb 12 2018 2:07AM | Last Updated: Feb 11 2018 11:08PMलिंब : वार्ताहर

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचा जागोजागी बट्टयाबोळ झाला असताना महामार्गालगतच्या काही हॉटेल व्यवसायिकांनीही डिव्हायडर व संरक्षक कठडे कुठे फोडून तर कुठे मुजवून मनमानीचा कहर केला आहे. या प्रकारामुळे वाहने उभी आडवी घुसत असून दुर्घटनांना निमंत्रण मिळू लागले आहे. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी डिव्हायडरची नासधूर करणार्‍या हॉटेल चालक व अन्य व्यवसायिकांवरही कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 

महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामात अनेक त्रुटी राहिल्या असल्याची स्थानिकांची तक्रार असून अनेक ठिकाणी रूंदीकरणाची कामे जीवावर बेतली आहेत.  हे कमी की काय म्हणून महामार्गालगतच्या काही हॉटेल व्यवसायिकांनीही जागोजागी डिव्हायडर व संरक्षक कठड्यांची वाट लावली आहे. आनेवाडी टोलनाक्यापासून अगदी कराडपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक ठिकाणी  असे प्रकार दिसून येत आहेत. डिव्हायडर फोडून अथवा डिव्हायडरच्या लगत माती टाकून महामार्गावरील वाहने हॉटेलमध्ये येण्यासाठी रस्ता तयार करून एकप्रकारे अपघात स्पॉट तयार केले आहेत. या गोष्टीकडे महामार्ग प्राधिकरणासह पोलीस खात्याने दुर्लक्ष केले आहे.

अपघात टाळण्यासाठी महामार्गाच्या सर्व्हिस रोड आणि मुख्य महामार्ग यामध्ये प्रामुख्याने डिव्हायडर बनवण्यात आले आहेत. वाहन धारकांना सर्व्हिस रोडवरून  महामार्गावर येण्यासाठी ठिकठिकाणी डिव्हायडरमध्ये रस्ते ठेवण्यात आले आहेत. मात्र, या ठिकाणाहून हॉटेलपर्यंत येण्यासाठी बरेच अंतर असल्यामुळे वाहनधारक सहसा महामार्गावरून सर्व्हिसरोड लगतच्या हॉटेलकडे जात नाहीत. त्यामुळे ग्राहकांना हॉटेलमध्ये तसेच व्यवसायाच्या ठिकाणी येण्यासाठी त्यांना दूरवरून फिरून यावे लाग नये म्हणून काही हॉटेल व्यवसायिकांनी डिव्हायडर फोडण्याची अथवा माती टाकून डिव्हायडरच मुजवून टाकण्याची शक्कल लढवली आहे. डिव्हायडरवर खडीची कच किंवा माती टाकून ग्राहकांच्या वाहनांना एक प्रकारे रस्ताच तयार करून ठेवला आहेच परंतु त्याबरोबर या डिव्हायडरमध्ये  व्यावसायिकांनी  आपला कर्मचारी ठेवला आहे. हा कर्मचारी शिट्टया फुकत महामार्गावरील वाहनधारकांना खानाखुना करून हॉटेलकडे वळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. 

फोडलेले डिव्हायडर पूर्ववत करा...

हॉटेल चालकांसह इतर व्यावसायिकांनीही डिव्हायडर फोडून अथवा डिव्हायडरवरून बनवलेले रस्ते पूर्णपणे बेकायदेशीर आहेत. अशा प्रकारे रस्ते बनवणार्‍या हॉटेल चालकांसह इतर व्यावसायिकांवरही कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यकता असताना पोलिस खात्यासह महामार्ग प्राधिकरण विभागाने  पूर्णतः दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. अशा व्यावसायिकांवर तात्काळ कारवाई करण्यात येऊन फोडलेले डिव्हायडर तसेच डिव्हायडरवर टाकलेली माती काढून  महामार्ग पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांसह वाहनधारकांतून  होत आहे.