Thu, Feb 21, 2019 11:20होमपेज › Satara › कोटेश्‍वर मंदिरातील दोघांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले

कोटेश्‍वर मंदिरातील दोघांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले

Published On: Aug 19 2018 1:26AM | Last Updated: Aug 18 2018 11:28PMलिंब : वार्ताहर

धोम धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने लिंब - गोवे येथील कृष्णा नदीला पूर आल्याने जुन्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. दरम्यान, पुलालगतच्या नदीतील कोटेश्‍वर मंदिरात मुक्कामास असणार्‍या दोन पुजार्‍यांना गोवे गावातील दोघांनी बाहेर काढल्याने सुदैवाने हानी टळली. 

लिंब - गोवे येथील लक्ष्मण क्षीरसागर व भगवान निकम रा. गोवे हे  कोटेश्‍वर मंदिरात मुक्कामास  होते.  मुक्कामादरम्यान रात्रीच पुलावरुन पाणी गेल्याने मंदिरालाही पाण्याचा वेढा पडला. मंदिरात दोघे अडकल्याचे समजताच  वनगळ येथील डॉ. शशिकांत साळुंखे व गोवे येथील रोहित वंजारी या दोघांनी पुराच्या पाण्यातून पुजार्‍यांना सुखरुप बाहेर काढले. सातारचे तहसीलदार निलप्रसाद चव्हाण यांनी तत्काळ घटनास्थळी  भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी डॉ. साळुंखे व वंजारी यांचे अभिनंदनही केले. जिल्ह्यात सर्वत्र पावसाने उघडीप दिली असली तरी वाई परिसरात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने धोम धरणात पाणी साठ्यात वाढ झाल्याने धोम धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने शुक्रवारी रात्री पासून लिंब - गोवे येथील कोटेश्‍वर मंदिरानजीकच्या जुन्या पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे पुलावरून होत असलेली वाहतूक बंद झाली असून नवीन पुलावरून वाहतूक वळवण्यात आली आहे.