Tue, Apr 23, 2019 01:39होमपेज › Satara › कराडात नगरसेवकांसह कार्यकर्त्यांकडून धोका

कराडात नगरसेवकांसह कार्यकर्त्यांकडून धोका

Published On: Apr 12 2018 7:06PM | Last Updated: Apr 12 2018 7:37PMकराड : प्रतिनिधी

माहिती अधिकाराचा वापर करत कराडच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, बांधकाम सभापती, नगरसेवक, नगरसेविका यांच्याविरुद्ध जिल्हाधिकारी तसेच शासनाकडे तक्रारी दाखल करत त्यांच्यापुढे अडचणी निर्माण करणारे आरटीआय कार्यकर्ते इम्तियाज बागवान यांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. काही नगरसेवक तसेच त्यांचे कार्यकर्ते आपणास मारहाण करण्याच्या तयारीत आहेत, तसेच ते खोट्या गुन्ह्यातही अडकवण्याच्या तयारीत असल्याचा दावा बागवान यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

6 एप्रिलला कराडमधील मुख्य बाजारपेठेत भरवस्तीतील चावडी चौक परिसरात आरटीआय कार्यकर्ते इम्तियाज बागवान  यांना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बागवान यांना अनोळखी युवकांनी मारहाण केली होती. त्यानंतर आता बागवान यांनी काही नगरसेवकांसह त्यांचे कार्यकर्ते खोट्या गुन्ह्यात गोवण्यासह मारहाण करण्याच्या तयारीत आहेत, असा दावा केला आहे. त्याचबरोबर काही नगरसेवक आणि अधिकार्‍यांची गैरकृत्ये समोर आणून त्याबाबत तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींवरून सध्या चौकशी सुरू असून त्यांच्यामुळेच आपल्यावर काही नगरसेवक व त्यांचे कार्यकर्ते चिडून आहेत, असा दावाही बागवान यांनी केला आहे. 6 एप्रिलला आपणावर झालेला हल्ला त्याचाच एक भाग असल्याची शंकाही बागवान यांनी उपस्थित केली आहे.

यापूर्वी कराडमधील वादग्रस्त फ्लेक्स प्रकरणी शासनासह उच्च न्यायालयात बागवान यांनी धाव घेत नऊ नगरसेवकांसमोर अडचण निर्माण केली होती. त्यानंतर पालिकेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी सर्व 32 नगरसेवकांविरूद्ध शासनाकडे त्यांनी तक्रार दाखल केली होती.  नगरसेविकांचे पती तसेच नातेवाईक पालिका सभागृृहात तसेच पालिकेत पत्नीच्या अधिकारांचा वापर करतात, असा  दावा करत याबाबत नगराध्यक्षांसह 13 नगरसेविकांविरूद्ध जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडे बागवान यांनी तक्रार केली असून या तक्रारीवरून दहा दिवसांपूर्वी चौकशीही सुरू करण्यात आली आहे.

त्याचबरोबर विद्यमान उपनगराध्यक्ष, बांधकाम सभापती यांच्यासह काही नगरसेवकांविरूद्धही माहिती अधिकारातून माहिती मिळवत त्यांना अपात्र करावे, म्हणून बागवान यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे, शासनाकडे तक्रारी केल्या आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर आपणास मारहाण करणार्‍या युवकांना राजकीय व आर्थिक पाठबळ दिले जात आहे. त्यामुळेच ते पुन्हा मारहाण करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळेच आपल्यासह कुटुंबियांना संरक्षण मिळावे, अशी मागणीही बागवान यांनी केली आहे.