Thu, Jul 18, 2019 16:31होमपेज › Satara › जीवात जीव असेल तोपर्यंत तुमच्यासोबत 

जीवात जीव असेल तोपर्यंत तुमच्यासोबत 

Published On: Feb 25 2018 1:13AM | Last Updated: Feb 24 2018 11:18PMसातारा : प्रतिनिधी

मी राजा नाही, लोकशाहीतील तुम्ही सगळे राजे आहात. एकच सांगतो, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत तुमच्यासाठी काम करेन, अशा शब्दात भारावलेल्या खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी जिल्हा परिषदेच्या मैदानावर जमलेल्या विराट जनसमुदायाला शब्द दिला. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या साक्षीने सातारा जिल्ह्यातील तमाम जनतेने उदयनराजेंचा वाढदिवस विक्रमी संख्येने साजरा केला. 

खा. श्री. छ.  उदयनराजे म्हणाले, कार्यक्रमामध्ये मान्यवरांनी कारण नसताना माझी स्तुती केली. सर्व वरिष्ठ नेते व मान्यवरांना केंद्रबिंदू मानून विकासकामे करताना मी कोठेही कमी पडणार नाही. सत्ता असो वा नसो त्याला मी फारशी किंमत देत नाही. मात्र, जोपर्यंत मी उराशी जिद्द बाळगली आहे. माझ्यात ताकद व श्‍वास आहे तोपर्यंत तुमच्यासाठी मी  जगणार आहे. तुमच्या सर्वांचे कायमस्वरूपी प्रेम पाठिशी रहावे. त्याच्यामुळे उर्जा व ताकद मिळते. त्यामुळेच आतापर्यंत मला सेवा करण्याची संधी मिळाली. सर्वांनी प्रेम दिले त्यातच मी धन्य झालो. मी तुमच्यासारखाच एक माणूस आहे. कुठल्याही घरात जन्माला आलो असलो तरी तुमच्यासाठी मी कायम कार्यरत असणार आहे. माझ्या कारकिर्दीत अनावधानाने चूक झाल्यास तुम्ही मला सांगा. माझ्याकडून कोणाचाही अवमान होणार नाही. काही समस्या असतील तर कधीही घेऊन या त्या निश्‍चित सोडवल्या जातील. मी कुठेही कमी पडणार नाही. समाजामुळेच आम्ही आहोत हे कदापिही विसरणार नाही हे सांगताना खा. उदयनराजे भावूक झाले होते. 

ना. विजय शिवतारे म्हणाले, खा. उदयनराजे भोसले हे सर्वांना आपलेसे वाटतात, हेच खरे त्यांचे यश आहे. स्वत:बद्दल कोणत्याही प्रकारचा गर्व नाही. महाराष्ट्रातील तरूणांच्या मनावर अधिराज्य गाजवतील असे हे नेतृत्व आहे. इतिहासात कामाची नोंद व्हावी असा सातार्‍याचा विकास झाला पाहिजे हा एकच ध्यास त्यांचा आहे. ते लोकांसाठी झटणारे नेते आहेत. सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्याकडून लोकांसाठी चांगली कामे केली जातात. आज झालेल्या विकासकामांच्या भूमिपूजनात ते दिसून आले.  

ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, खा. उदयनराजे यांना महाराष्ट्राचे व देशाचे नेतृत्व करायचे आहे. केवळ वाढदिवस न करता सातारा शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम उदयनराजेंनी केले आहे. खा. उदयनराजे यांच्याकडे मोठे कर्तृत्व आहे. कोणतेही विकासकाम करताना ते स्वतः आमच्याकडे येतात. एवढे मोठे महाराज आणि ते आमच्याकडे विकासकामे घेऊन आल्यानंतर आम्हाला संकोच वाटतो. ते राज्यमंत्री असताना कासची बंदिस्त पाईपलाईन झाली आणि आता योगायोग म्हणजे त्यांच्याच काळात आता कास धरणाची उंची वाढवण्यात येत आहे. यामुळे सातारकरांचा पाणी प्रश्‍न सुटून नागरिकांना मुबलक पाणी मिळणार आहे. 

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, उदयनराजे हे सर्व मतदारांच्या हृदयात जाऊन पोहचलेले असे हे नेतृत्व आहे. अन्यायाला वाचा मित्राला मदत आणि  सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी उदयनराजे कोणतीही तमा बाळगत नाही. कार्यक्रमाला झालेल्या गर्दीवरून लोक त्यांच्यावर किती प्रेम करतात हे दिसून येते. मी खासदार असताना ते एकदा दिल्लीत आले होते तेव्हाच त्यांच्या नेतृत्व गुणांची चुणूक दिसली होती. त्यांच्यात नेतृत्वगुण असल्याने त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे. हा वाढदिवस नव्हे तर विकासकामांचा समारंभ आहे. सातरकरांसाठी ते भांडून आणि हटून कामे करून घेतात. ते नेहमी लोकांचा विचार करत असल्यामुळे त्यांची एवढी लोकप्रियता आहे. तुम्ही जिल्ह्याचे खासदार आहात तुमच्याकडून अशीच कामे होऊ द्या सातार्‍याप्रमाणे कराडचाही विकास करा कराडला विसरू नका, अशी मिश्किल टिप्पणीही आ. चव्हाण यांनी केली. 

प्रास्तविकात आ. शंभूराज देसाई म्हणाले, खा. उदयनराजे यांनी या जिल्ह्याचा विकास केला आहे. छत्रपती घराण्यावर सातारा जिल्ह्याच्या जनतेचे प्रेम आहे. ते या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उठून दिसत आहे. आभार सुनील माने यांनी मानले. सूत्रसंचलन सुधीर गाडगीळ यांनी केले. 

शरद पवारांचे नाव घेताना उदयनराजे गहिवरले !

कार्यक्रमामध्ये खा. शरद पवार यांनी मनोगत व्यक्‍त केल्यानंतर खा. उदयनराजे भाषण करण्यासाठी उभे राहिले. मात्र, काही वेळ समर्थकांनी घोषणाबाजी केल्याने त्यांना काहीच बोलता आले नाही. मात्र, त्यांनी भाषण सुरू केल्यानंतर त्यांचा कंठ दाटून आला होता. सुरूवातीला त्यांच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते. तर आवाजामध्ये बदल जाणवत होता. खा. शरद पवार यांचे नाव घेताना अक्षरश: त्यांना रडू कोसळले. त्यामुळे गहिवरल्या आवाजात त्यांनी आपले भाषण पूर्ण केले. 

नाहीतर मला सोडचिठ्ठी मिळेल  

खा. उदयनराजे भोसले यांचे भाषण सुरू असताना गर्दीमधील एका युवकाने ‘महाराज, आय लव्ह यू’ असे उद‍्गार काढले. त्यावेळी खा. उदयनराजे यांनी थोडा वेळ थांवून स्मितहास्य करत मुलगी असती तर ठीक आहे. मात्र, या ठिकाणी मुलगा आहे. बरे झाले मुलगी नाही. अन्यथा आमची सोडचिठ्ठी निश्‍चित झाली होती, असे सांगितल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

हरभर्‍याच्या झाडावर चढवले 

खा. उदयनराजेंनी मनोगताला सुरूवात करताना मान्यवरांनी आपले जास्त कौतुक करून हरभर्‍याच्या झाडावर चढवले असल्याचे सांगितले. खा. उदयनराजे यांच्यापूर्वी मुख्यमंत्री, शरद पवार यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्‍त केले होते. त्यामध्ये खा. उदयनराजेंबद्दल स्तुती सुमने उधळली. त्यावर बोलताना खा. उदयनराजे म्हणाले. इथे कोणी हरभर्‍याचे झाड लावले आहे का? कारण नसताना माझी स्तुती केल्यामुळे मन भारावून गेले.

गर्दीवर नियंत्रण मिळवताना पोलिसांच्या नाकीनऊ

कार्यक्रम सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषद मैदान गर्दीने खचाखच भरून गेले होते. कार्यक्रमाचा माहोल एकदम उदयनराजेमय झाला होता. मैदानात बसण्यासाठी जागा नसल्याने नागरिक मैदानाबाहेर मुख्य प्रवेशद्वाराबाहेर मोठ्या संख्येने उभे होते. खा. शरद पवार यांच्या भाषणापूर्वी उभ्या असलेल्या नागरिकांनी पोलिसांना खेटाखेटी करत गेटचा दरवाजा खुला केला. गेटचा दरवाजा खुला केल्याने मोठा जमाव मैदानात घुसला. या गर्दीला पांगवताना पोलिसांना नाकी नऊ आले. त्यानंतर ही गर्दी कार्यक्रम संपेपर्यंत कायम होती.