Wed, Jun 26, 2019 12:21होमपेज › Satara › राष्ट्रवादीतील गद्दारांची नावे योग्यवेळी जाहीर करू

राष्ट्रवादीतील गद्दारांची नावे योग्यवेळी जाहीर करू

Published On: Apr 21 2018 1:04AM | Last Updated: Apr 20 2018 10:37PMम्हसवड : प्रतिनिधी

माण विधानसभा मतदारसंघात एक-एक सत्तास्थाने मिळवत असताना शेखरभाऊंनी अनेक अडचणींचा सामना केला आहे. कार्यकर्त्यांना किंवा सर्वसामान्य जनतेला पुढे न घालता स्वत: समोर येऊन अनेक कामे करून दाखवली. प्रसंगी त्यांनी निवडणुका जिंकण्यासाठी व पक्षवाढीसाठी स्वत:च्या अंगावर अनेक गुन्हेही ओढवून घेतले आहेत. शेखरभाऊंच्या वाटचालीत राष्ट्रवादीच्या गद्दारांनी  अडथळे आणले आहेत. त्याचे  पुरावे  आपल्याकडे असून योग्य वेळी या गद्दारांची नावे जाहीर करु,  असा इशारा सौ. सुरेखा पखाले यांनी दिला आहे.

शेखरभाऊ गोरे यांची राजकीय वाटचाल नेहमीच चर्चेत राहिली आहे.  माण पंचायत समितीचे सदस्य झाल्यानंतर शेखरभाऊंनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली असली तरी तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणा- कडेच आपले लक्ष केंद्रीत केले आहे. असे असले तरी या संघर्षमय वाटचालीत त्यांच्यावर काही गुन्हेही दाखल झाले. त्यामुळे शेखरभाऊ मतदार संघात परत लवकर येणार नसल्याच्या वावड्या उठल्या. यासंदर्भात त्यांच्या भगिनी सौ. सुरेखा पखाले यांनी दहिवडीतील पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली.  

त्या म्हणाल्या, शेखरभाऊंचे मतदारसंघाबरोबरच जिल्ह्यात वाढत चाललेले प्रेम,  राजकीय ताकद अनेकांच्या डोळ्यात खुपत होती. त्यातच आ. जयकुमार गोरेंना थांबवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते. मात्र ते कोणालाही जमले नव्हते ते माझ्या वाघाच काळीज असलेल्या भावाने करून दाखवले होते. आपला स्वार्थ साधल्यानंतर अनेकांना भविष्याच्या राजकारणात शेखरभाऊंचा आपल्याला धोका होऊ शकतो अशी भीती वाटली. म्हणून त्यांनी व्यूहरचना आखण्यास सुरूवात केली होती. त्यात वरकुटे-म्हसवडचे सोलर कंपनीचे प्रकरण झाले. शेतकर्‍यांच्या हितासाठी लढत असताना व भाऊ त्याठिकाणी नसताना त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

राजकीय दबावापोटी भाऊंवर या धुरंधरांनी चुकीच्या पध्दतीने राजकीय मोका लावत त्यांची राजकीय कारकिर्द संपवण्याचा डाव रचला होता. या प्रकरणात भाऊंवर दाखल झालेले गुन्हे हे राजकारणातील तसेच जनतेच्या हितासाठी विविध आंदोलनातील होते.त्यात काही गुन्हे माघारीही घेण्यात आले होेते तरीही मोका लावण्यात आला होता. याविरोधात भाऊंनी न्यायदेवेतेकडे अन्यायाविरोधात दाद मागितली होती. न्यायालयाने सर्व कागदपत्रांची पाहणी करून पोलीसांवर ताशेरे ओढत त्यांच्यावरील मोक्‍का हटवण्याचा निर्णय देत त्यांना न्याय दिला. मोक्यामुळे शेखरभाऊ दोन-तीन वर्षे मतदारसंघात येऊ शकत नाहीत, तो निवडणूक लढवत शकत नाही अशा अफवा अनेकांनी पसरवल्या होत्या.त्या सर्वांना चपराक देत भाऊ लवकरच मतदारसंघात येणार असल्याचे सौ. सुरेखा पखाले यांनी सांगितले.

ज्या राष्ट्रवादी पक्षाला भाऊंनी पडत्या काळात एवढी मदत करून उभारी देण्याचे काम केले होते त्याच राष्ट्रवादी पक्षाने भाऊंच्या पडत्या काळात त्यांना मदत केली नाही.तरीही आम्ही प्रामाणिकपणे पक्षवाढीसाठीच प्रयत्न करत राहिलोय. मतदारसंघात शेखरभाऊंच्याच रुपाने राष्ट्रवादीचा आमदार होणार हे निश्‍चित असून त्याची मोर्चेबांधणीही आम्ही सुरू केली आहे.

त्या पुढे म्हणाल्या, स्व. सदाशिवराव पोळ तात्यांच्यानंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी पक्षाला वारंवार मदत करणार्‍या शेखरभाऊंना राष्ट्रवादी पक्षात घेण्यात आले. त्यानंतर सातारा-सांगली विधानपरिषदेची निवडणूक लागली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे मतदान कॉग्रेसच्या दुप्पट होते. ही निवडणूक राष्ट्रवादीच्या दृष्टीने एकतर्फी असताना काँग्रेसकडून स्व.माजी मंत्री पतंगराव कदम यांचे बंधू मोहनराव कदम उमेदवारी करत आहेत. कदम हे राजकारणातील मोठे नाव होते त्यांच्या विरोधात उभे राहून आपण कसे निवडून येणार? याची भीती मनात धरत राष्ट्रवादीची मातब्बर नेतेमंडळी उमेदवारीपासून दूर पळत होते. उमेदवारीसाठी कोणीही तयार होईना असा अंदाज आल्यानंतर शेवटी पक्षश्रेष्ठींनी हे काम माण-खटावचा वाघ असणार्‍या माझ्या भावावर सोपवले.

त्यांनीही पक्षश्रेष्ठींचा शब्दाचा मान राखत राजकारणात बलाढ्य समजल्या जाणार्‍या कदम घराण्याच्या उमेदवाराशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला. या निडणुकीत पक्षाचे सर्वेसर्वा पवार साहेब, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा, सभापती ना.रामराजे साहेब, माजी अर्थमंत्री जयंत पाटील आदी मातब्बर नेतेमंडळी स्वत: लक्ष घालून होते.जिंकण्यापेक्षा कितीतरी वाढीव मते राष्ट्रवादीची असताना या निवडणुकीत शेखरभाऊंना म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागले.कारण राष्ट्रवादीला गद्दारीचे लागलेले ग्रहण याही निवडणुकीत दिसून आले.पक्षातीलच काहींनी गद्दारी करत आर्थिक हितसंबंध जपत आपली मते विरोधकांना बहाल केली. त्यात पक्षाचे प्रमुख पदाधिकारीही सामील होते.

शेखरभाऊंनी आपल्या नेतृत्वाचे कसब पणाला लावत ताकद लावली खरी पण त्यांना पक्षातीलच गद्दारांमुळे यश आले नाही. मात्र, भाऊंच्या कल्पक नियोजनाची विरोधकांनाही चांगलीच धडकी बसली होती. पराभव स्वीकारावा लागला असला तरी कदमांना आपल्या नेतृत्वाचा करिश्मा दाखवत चांगलाच दम भरण्याचे काम शेखरभाऊंनी करून दाखवले होते.एका मातब्बर घराण्याच्या विरोधात एका सर्वसामान्य कुटूंबांतील व्यक्ती जोरदार लढत देते हे पाहून जनतेच्या मनात भाऊंच्याविषयी आपुलकी व प्रेम वाढले गेले. या निवडणुकीत भाऊंना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला होता. या निवडणुकीत व जि.बँकेच्या निवडणुकीत कोणी गद्दारी केली त्यांची नावे पुराव्यासह आमच्याकडे आहेत योग्य वेळ आली की ती उघडही करू,  असा इशारा सौ. सुरेखा पखाले यांनी दिला आहे.