Tue, Jul 23, 2019 06:17होमपेज › Satara › शेंद्रे परिसरात बिबट्याचा वावर

शेंद्रे परिसरात बिबट्याचा वावर

Published On: Jan 21 2018 2:55AM | Last Updated: Jan 20 2018 10:45PMशेंद्रे : वार्ताहर   

शेंद्रे, सोनगावच्या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. पेरूचे शिवारातील बोकड, वासरू फस्त करून गेलेला  बिबट्या शनिवारी सकाळी मळवी शिवारात दिसला. वनविभागाकडे संपर्क करूनही ते याकडे दुर्लक्ष करीत आहेत.  त्यामुळे जीव गेल्यावर तर प्रशानसनाला जाग येणार का, असा  संतप्त सवाल   परिसरातील नागरिक करत असून बिबट्याला त्वरित जेरबंद करण्याची मागणीही नागरिकांची आहे.

बिबट्याच्या सततच्या वावराबाबत शेंद्रे, सोनगाव परिसरातील नागरिकांनी वनविभाग अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून टोलवाटोलवी होत आहे. काही अधिकारी तर फटाके वाजवा, पिंजरा आणण्यासाठी पैसे भरावे लागत असून ते कोण भरणार, असा उलटप्रश्‍न नागरिकांना करत आहेत. त्यामुळे बिबट्या पकडण्याचे काम नेमके कोणाचे आहे? असा प्रश्‍न परिसरातील नागरिकांना आता पडू लागला आहे. 

बिबट्याने सोनगाव येथील शेतकरी उत्तम नावडकर यांच्या गायीचे वासरू, दिलीप माने यांचे बोकड बिबट्याने फस्त केले आहे. याचा पंचनामा करायला देखील प्रशासनाला वेळ नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. शेवटी नागठाणे येथील डॉक्टरांनी बोकडाचा व वासराचा पंचनामा केल्यानंतर बिबट्यानेच हल्ला केला असल्याचे निदर्शनास आले. पशुवैद्यकीय विभाग, वनविभाग या परिसरात दुर्लक्ष करत टोलवाटोलवी करत असल्यामुळे नागरिक वैतागले आहेत.

त्यात या परिसरात ऊसतोडीबरोबर शेतीचे अनेक कामे चालली असून बिबट्याच्या सततच्या वावरामुळे शेतकर्‍यांची कामे ठप्प पडली आहेत. गेल्या दहा दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे सतत दर्शन होत असून, याबाबत प्रशासनाने त्वरित कार्यवाही करण्याची मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.