होमपेज › Satara › अवकाळी फाटा परिसरात बिबट्याचा वावर

अवकाळी फाटा परिसरात बिबट्याचा वावर

Published On: Jan 28 2018 1:32AM | Last Updated: Jan 27 2018 10:12PMमहाबळेश्‍वर : वार्ताहर 

महाबळेश्‍वर-पाचगणी रस्त्यावरील अवकाळी फाट्यापासून काही अंतरावर बिबट्याने शिकार केलेल्या भेकराचे अर्धवट खाल्लेल्या अवस्थेतील अवशेष सापडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात घनदाट जंगल असून बिबट्यासह लहान मोठे प्राणी आढळत असल्याने लोकांमध्ये भीती आहे.

दोन दिवसांपूर्वी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या लोकांना अवकाळी गावच्या हद्दीत अर्धवट खाल्लेल्या भेकराचे अवशेष आढळून आले. या भेकराची शिकार करून बिबट्याने ते फस्त केले. मात्र, रस्ता ओलांडत असताना वाहन आल्याने ते अवशेष तिथेच सोडून बिबट्या जंगलात पळून गेला असावा असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.

भेकराचे अवशेष आढळलेल्या ठिकाणापासून रस्त्याच्या पलिकडे मातीत बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने भेकराची शिकार बिबट्याने केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच भागात अनेक वेळा रस्ता ओलांडताना अनेक प्राणी जखमी झाले आहेत.