Sat, Nov 17, 2018 08:43होमपेज › Satara › होय, तो बिबट्याच...!

होय, तो बिबट्याच...!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

फलटण : प्रतिनिधी 

फलटण शहरात मंगळवारी रात्री 1.30 वाजता सिटी प्राईड सिनेमाच्या आवारात सीसीटीव्हीत बिबट्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी शहरात विविध ठिकाणी बिबट्या आढळल्याचे दै. पुढारीने प्रसिद्ध केल्यानंतर बिबट्याबाबत माहिती घेतली जात होती.  दरम्यान, वनखाते, पोलिस, नगरपालिका यांनी त्याच्या शोध मोहिमेला सुरुवात करण्याबरोबर नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. 

फलटण शहरात दि. 28 रोजी सकाळी 5.30 वाजता नवलबाई मंगल कार्यालय, मारवाड पेठ येथे शहराच्या मध्यवर्ती भागात एक व्यापारी परगावी निघाले असताना त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यानंतर वनखात्याच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी शहरासह परिसर अक्षरश: पिंजून काढला. मात्र त्यांना कोठेही बिबट्या आढळला नाही. तथापी, विमानतळ परिसरात काहींनी बिबट्या पाहिल्याचे त्यांना सांगितले.

बुधवार दि. 29 रोजी सकाळी बारस्कर चौकातील एका मंदिरात बिबट्याने दर्शन दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याची खातरजमा होवू शकली नाही दरम्यान, शहरातील गजानन चौक येथील सिटीप्राईड (जुने नामवैभव) थिएटरच्या सीसीटिव्ही कॅमेर्‍यात रात्री 1.30 वाजता बिबट्या थिएटर आवारात फिरताना व त्यानंतर कुंपण भिंतीवरुन उडी मारुन बाहेर जाताना चित्रीत झाल्याचे दिसले. त्यामुळे गेल्या 2 दिवसापासून बिबट्या फलटण शहरात असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

दरम्यान, वन खाते व पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेतला जात असून नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरुन जावू नये, मात्र सावधानता बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे. ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना सतर्क करण्याच्या सूचना बिबट्या आढळून आलेल्या सिटी प्राईड सिनेमा येथे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी जावून सीसीटिव्हीत कैद झालेला बिबट्या पाहिल्यानंतर रखवालदार व अन्य कर्मचार्‍यांशी चर्चा चर्चा केली.

यानंतर रघुनाथराजे यांनी वनखात्याचे अधिकारी, पोलीस अधिकारी व नगराध्यक्षा सौ. निता नेवसे, मिलिंद नेवसे, पालिका अधिकार्‍यांशी चर्चा करुन नागरिकांना सतर्क करण्याच्या सूचना दिल्या. पालिका व वनखात्याच्या वाहनातून फलटण शहर व कोळकी, जाधववाडी, ठाकुरकी, फरांदवाडी, अलगुडेवाडी ध्वनीक्षेपकाद्वारे माहिती देवून सकाळी फिरावयास जाणारे नागरिक, विद्यार्थी-पालक व नागरिकांनी सावध करण्याच्या सुचना  त्यांनी दिल्या.