Thu, Jun 27, 2019 17:59होमपेज › Satara › लेकरासाठी हे फक्‍त आईच करू शकते!

लेकरासाठी हे फक्‍त आईच करू शकते!

Published On: Apr 16 2019 2:21AM | Last Updated: Apr 16 2019 12:36AM
कराड : अमोल चव्हाण

उसाच्या शेतात सापडलेल्या बिबट्याच्या पिल्लावर उपचार करून त्याच्या अन्‍नपाण्याची व्यवस्था वन विभागाने केली होती. तसेच बिबट्याने पिल्लाला घेऊन जावे म्हणून गेली सहा दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. या कालावधीत मादी बिबट्या दररोज रात्री दोन वेळा घटनास्थळी जाऊन आपले पिल्‍लू सुरक्षित असल्याची खात्री करत होता. शेवटी सहाव्या दिवशी बिबट्या आपल्या पिलाला घेऊन तेथून पसार झाला. ही बाब वनविभागाने लावलेल्या कॅमेर्‍यामध्ये कैद झाली आहे. कराड परिक्षेत्राचे वन अधिकारी डॉ. अजित साजणे, वन विभाग व वन अभ्यासकांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे समाधान त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होते. आपल्या लेकरासाठी हे फक्‍त आईच करू शकते, हे यातून स्पष्ट झाले. 

कराड तालुक्यातील काले-धोंडेवाडी येथील चौगुले मळ्यातील जयकर बाबुराव पाटील यांच्या करीच्या शिवारात ऊसतोड सुरू असताना तोडणी कामगारांना अचानक सरीमध्ये बिबट्याचा एक जिवंत व एक मृत बछडा आढळून आला. ऊस तोडणी कामगारांनी त्यांना त्वरित सुरक्षित स्थळी हलवले व ही बाब काले गावच्या पोलिस पाटलांना सांगितली. त्यानंतर तोडणी कामगारांना उसाच्या शेतात मादी बिबट्या असेल म्हणून ते संपूर्ण शेतच पेटवून दिले. ऊस पेटल्याने शेतात लपलेला बिबट्या तेथून पळून गेला. तो पळून जात असताना लोकांनी पाहिले होते.

याच दरम्यान पोलीस पाटील दीपक पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ याची माहिती कराड परिक्षेत्राचे वनाधिकारी डॉ. अजित साजणे व वन अभ्यासक रोहन भाटे यांना सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून ते त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हिंगमिरे यांना घटनास्थळी बोलावून घेतले. 

जिवंत बछड्याची तपासणी करण्यात आली. त्याचे तापमान व इतर पॅरामिटर नॉर्मल असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर मृत पिल्लाचा पंचनामा व पोस्टमार्टम करण्यात आले. उपासमारीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सहाय्यक वनरक्षक किरण कांबळे व परिक्षेत्र वन अधिकारी डॉ. अजित साजणे यांच्या उपस्थितीत बिबट्याच्या मृत पिल्लाचे दहन करण्यात आले. जिवंत पिल्लास डॉक्टरांच्या सुचनेनुसार दर तीन तासाला 25 मिली मेंढीचे दूध पाजण्यात आले. 

दरम्यान जिवंत पिल्लाला त्याच्या आईजवळ सोडण्यासाठी डॉ. अजित साजणे यांची धडपड सुरू झाली. माहिती घेत असताना पश्‍चिम महाराष्ट्रात जिवंत पिल्लू सापडणे व त्याच्या जवळपास मादी बिबट्या असणे अशा घटना यापूर्वी घडल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपले पिल्लू जाग्यावर नसल्याने मादी बिबट्या बिथरु नये किंवा कोणावर हल्ला करू नये म्हणून काही तज्ञ व वरिष्ठांशी सल्लामसलत करण्यात आली. त्यानुसार सापडलेले जिवंत पिल्लू त्याच ठिकाणी ठेवल्यास मादी त्याला घेऊन जाईल, अशी खात्री डॉ. साजणे यांना वाटत होते. म्हणून त्यांनी त्याच दिवशी सायंकाळी जिवंत पिल्‍लास कॅरेटमध्ये घालून पुन्हा घटनास्थळी नेवून ठेवले. त्या कॅरेटच्या चारही बाजूला रात्री चित्रीकरण करण्यासाठीचे कॅमेरे लावण्यात आले. त्या रात्री दोन वेळा मादी बिबट्या पिल्‍लाच्या कॅरेट जवळ येऊन वास घेऊन निघून गेल्याचे कॅमेर्‍यात स्पष्ट दिसत होते. मात्र त्या रात्री मादी बिबट्याने पिलाला नेले नाही. त्यामुळे दुसर्‍या दिवशी सकाळी डॉक्टरांना दाखवून त्यांच्या सल्ल्यानुसार पिल्लाला पुन्हा दूध सुरू करण्यात आले. 

सलग पाच दिवस मादी पिल्लास घेऊन जाईल म्हणून जाग्यावरच विविध प्रकारचे कॅमेरे व बिबट्याला पिल्लाचा वास यावा यासाठी अनेक युक्त्या करण्यात आल्या. या पाच दिवसांमध्ये दररोज रात्री मादी बिबट्या घटनास्थळी येऊन आपले पिल्लू सुखरूप असल्याचे खात्री करत होता. कदाचित वन विभागाने लावलेले कॅमेरे व कॅरेटला घाबरत असल्याने बिबट्याने पिल्लू येथून हलवले नाही. मात्र सहाव्या दिवशी आपल्या पिल्लाला सुखरूपपणे घेऊन बिबट्या तेथून पसार झाला.

वनविभागाच्या अधिकार्‍यांनी वनअभ्यासकांना बरोबर घेत सलग सहा दिवस न थकता बिबट्याच्या पिल्लाची योग्य प्रकारे काळजी घेऊन वरिष्ठांशी सल्लामसलत करत केलेल्या प्रयत्नांना यश आले. 
यासाठी पुणे प्रादेशिकचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, सातारचे उपवनसंरक्षक भारतसिंग हाडा व सहाय्यक वनसंरक्षक किरण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड परिक्षेत्राचे वनाधिकारी डॉ. अजित साजणे, वन अभ्यासक रोहन भाटे, वनपाल सुभाष पाटील, वनरक्षक योगेश पाटील, वनमजूर हणमंत मिठारे, धनाजी पाटील व चालक सौरभ लाड यांनी अथक परिश्रम घेतले.

नॅशनल जिओग्राफीची टीम कराडात दाखल
आई बिबट्या व त्याच्या दुरावलेल्या मुलाची भेट घडवून आणण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्याचा निर्णय डॉ. अजित साजणे यांनी घेतला. त्यानुसार माणिकडोह बिबट्या पुनर्वसन केंद्र जुन्नर येथील तज्ञ डॉ. अजय देशमुख यांना घटनास्थळी येण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार डॉ. देशमुख व त्यांचे सहकारी तसेच इंग्लंडहून खास नॅशनल जिओग्राफिकच्या चित्रीकरणासाठी आलेली टीम कराडमध्ये दाखल झाली होती, अशी माहिती डॉ. अजित साजणे यांनी दिली. 

सलग सहा दिवस न थकता बिबट्याच्या पिल्लाची योग्य प्रकारे काळजी घेऊन वरिष्ठांशी सल्लामसलत करत केलेल्या प्रयत्नांना यश आले. काही कारणाने मादी बिबट्यापासून दुरावलेल्या पिल्लाची पुन्हा भेट घडवून आणल्याचे समाधान वाटते.

डॉ. अजित साजणे परिक्षेत्र वनअधिकारी, कराड