Tue, Jun 25, 2019 15:09होमपेज › Satara › कराड : किल्ले सदाशिवगड परिसरात बिबट्याचा वावर

कराड : किल्ले सदाशिवगड परिसरात बिबट्याचा वावर

Published On: Jan 12 2019 11:23AM | Last Updated: Jan 12 2019 11:23AM
कराड (सातारा) : प्रतिनिधी

आठवडाभरापूर्वी कराड-विटा मार्गालगत राजमाची (ता. कराड) किल्ले सदाशिवगड परिसरातील जानाई मंदिरलगत असणाऱ्या पोपट बापू यांच्या क्रशर परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला. ही घटना ताजी असतानाच शनिवारी पहाटे किल्ले सदाशिवगड बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्या आपल्या चार पिल्लांसह या परिसरात वावरत असल्याचेही परिसरातील काही लोकांचे म्हणणे आहे.

स्वराज्यात अन्ययसाधारण महत्त्व असलेल्या ऐतिहासिक सदाशिवगड परिसरातील राजमाची येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. बिबट्या चार पिल्लांसह वास्तव्यास असल्याचे बोलले जात होते. मात्र तीन जानेवारीला प्रथमच बिबट्या पोपट बापू यांच्या क्रशर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बिबट्या या कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर शनिवार, १२ जानेवारीला पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाले. कराड अर्बंन बँकेंचे उपाध्यक्ष समीर जोशी हे आपले सहकारी बिपीन पाटील यांच्यासोबत नेहमीप्रमाणे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सदाशिवगडावर पोहचले होते. गडावरील महादेव मंदिरात दर्शन घेतल्यानंतर गडावर राजमाची बाजूकडे असणाऱ्या बुरूंजाकडे ते चालत निघाले होते. त्याचवेळी या परिसरात बिबट्या दबा धरून बसल्याचे त्यांना दिसून आले. मंदिर परिसरातील तीन ते चार कुत्रीही जोशी यांच्यासोबत होती. मात्र बिबट्याची चाहूल लागताच कुत्र्यांनी तेथून धूम ठोकली. तर समीर जोशी आणि पाटील यांनी मोठ्या धाडसाने बिबट्याच्या तोंडावर बॅटरीचा प्रकाशझोत टाकला. त्यानंतरही सुमारे दहा मिनिटे बिबट्या त्याच परिसरात होता. जोशी आणि पाटील यांनी तेथून न हटता प्रकाशझोत सुरूच ठेवल्याने अखेर बिबट्याने तेथून काढता पाय घेतला. त्यामुळेच आता सदाशिवगड परिसरात बिबट्याचा दर्शन झाले असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.