Fri, Jun 05, 2020 11:43होमपेज › Satara › सातारा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बिबट्याचा मृत्यू

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बिबट्याचा मृत्यू

Published On: Apr 05 2019 5:09PM | Last Updated: Apr 05 2019 5:17PM
बामणोली : वार्ताहर

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील  कोअर क्षेत्र असलेल्या वलवण (ता. महाबळेश्‍वर) गावच्या हद्दीत बिबट्याचा मृत्यू झाला असून या ठिकाणी हा बिबट्या सडलेल्या अवस्थेत आढळला. दरम्यान, कोअर क्षेत्रात ही घटना घडल्याने वन विभागाच्या कारभाराबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सिंधी व वलवण या भागात काम करत असणारे वनमजूर आपल्या भागात फिरती करत असताना त्यांना एका ठिकाणी बिबट्या मृतावस्थेत आढळला. बिबट्याचा मृत्यू हा दहा ते पंधरा दिवसांपूर्वी झाला असल्याचे बोलले जात असून यामुळे बिबट्या सडलेल्या अवस्थेत आढळून आला. वनमजुरांनी बामणोली वन कार्यालयाच्या ठिकाणी फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर सातारा या ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्यास असणारे वनपाल तसेच अतिरिक्त कार्यभार असणारे कोयनेचे वनक्षेत्रपाल शिंदे यांच्यासह वनरक्षकदेखील सातार्‍यात व बामणोलीमध्ये कायमस्वरूपी राहण्यास असल्याने सर्वांची ही घटना ऐकून पुरती तारांबळ उडाली. 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संवर्धन व संरक्षणासाठी असणारे वनपाल, वनरक्षक व वनक्षेत्रपाल हे आपापल्या भागात अजिबातच फिरकत नसतील तर मात्र त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. बिबट्याच्या मृत्यूची बातमी जर का एका वनमजुराकडून तीही सुमारे 15 दिवसांनी कळते तर आरव,म्हाळुंगे या बिटात काम करणारे वनरक्षक नक्की असतात तरी कोठे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बामणोलीचे वनविभागाचे कार्यालय  हे ‘असून अडचण आणि नसून खोळंबा बनले’ आहे. कारण या ठिकाणी काम करणारा एकही अधिकारी व कर्मचारी हे मुख्यालयात किंवा कोअर भागात अजिबात रहात नाहीत.  त्यामुळे ते दररोज नेमके काय काम करतात? असा प्रश्‍न उपस्थित केला  जात आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात बिबट्याचा मृत्यू नक्की कशामुळे झाला? त्याचे वय किती?  याबाबतची माहिती घेण्यासाठी वनाधिकारी त्याठिकाणी रवाना झाले आहेत.