Wed, Feb 20, 2019 13:07होमपेज › Satara › जखिणवाडीत बिबट्याचा हल्ला

जखिणवाडीत बिबट्याचा हल्ला

Published On: Feb 25 2018 1:13AM | Last Updated: Feb 24 2018 11:02PMकराड : प्रतिनिधी

जखिणवाडी (ता. कराड) येथे बिबट्याने केलेल्या हल्यात पाच शेळ्या व एक रेडकू ठार झाले. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सहा पाळीव प्राण्यांवर बिबट्याने एकाचवेळी हल्ला केल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी वनाधिकार्‍यांनी भेट दिली आहे. 

जखिणवाडी गावच्या हद्दीत पळुसदरा नावच्या शिवारात पावसे वस्ती आहे. या पावसे वस्ती येथे मारूती केरू पावसे यांचा जनावरांचा गोठा आहे. या गोठ्यात पावसे यांची जनावरे बाधलेली असतात. शुक्रवारी सायंकाळी जनावरांसह शेळ्या गोठ्यात बांधल्या होत्या. नेहमीप्रमाणे रात्री साडेसातच्या सुमारास पावसे जनावरांसह शेळ्यांना वैरण टाकून गावात गेले. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे लवकर वस्तीवर गेले असता चार शेळ्यांसह एका रेडकाच्या नरड्याचा चावा घेतल्याचे व त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

याची खबर पावसे यांनी वनविभागाला दिली. वनविभागाचे वनपाल संतोष जाधवर, वनरक्षक दादाराव बर्गे यांच्यासह कर्मचार्‍यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मृत शेळ्यांचा व घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनास्थळाची परिस्थिती  व शेळ्यांवर झालेल्या हल्ल्याची पध्दत पाहता हा हल्ला बिबट्यानेच केला असल्याचा अंदाज वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी व्यक्त केले आहे. यापूर्वी आगाशिवनगर परिसरात  अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाले आहे.  त्यामुळे ग्रामस्थांसह शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.