पळशी : वार्ताहर
भाडळे खोर्यातील चिलेवाडी (ता. कोरेगाव) येथील वाघदरा शिवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गाय ठार झाली असून, या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, भाडळे खोर्यातील चिलेवाडी गावातील अनेक शेतकरी आपली जनावरे वाघदरा डोंगराच्या परिसरात दरवर्षी चरण्यासाठी सोडत असतात. असेच चरण्यासाठी गेलेल्या प्रताप विनायक घोरपडे यांच्या गाईवर जंगली प्राण्याने हल्ला करून ठार केले असल्याचे घोरपडे यांना शनिवार दि. 3 रोजी सकाळी निदर्शनास आले.
त्यांनी ही घटना भाडळे वनरक्षक नम्रता जठार यांना कळवली. त्यानुसार वनक्षेत्रअधिकारी आर. एस. आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी चंद्रकांत जगदाळे व वनरक्षक नम्रता जठार यांनी घटना स्थळी भेट देउन पहाणी केली असता ठार झालेल्या गाईच्या आसपास मातीत त्यांना बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यातच गाय ठार झाल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेने नागरिक व शेतकर्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाच्या अधिकार्यांनी गावात बैठक घेतली. यावेळी त्यांनी डोंगराच्या कडेला अथवा शेतात जाताना एकटे दुकटे न जाता ग्रुपने जावा, शेतात काम करत असताना सावधगीरी बाळगावी, असे आवाहन नागरिकांना केले.