Wed, Nov 21, 2018 19:27होमपेज › Satara › बिबट्याचा लोकवस्तीत वावर 

बिबट्याचा लोकवस्तीत वावर 

Published On: Feb 20 2018 1:16AM | Last Updated: Feb 19 2018 10:04PMतारळे : वार्ताहर

वजरोशी (ता.पाटण) येथील शेतकरी महेश मोतीराम सावंत यांच्या गोठ्यातील चार शेळ्यांचा बिबट्याने फडशा पाडला. यात अंदाजे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बिबट्याचा लोकवस्तीत वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

घटनास्थळावरून व वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार वजरोशी - चिंचेवाडी रस्त्यावर जिल्हा परिषद शाळा (बौद्धवस्ती) लगत महेश सावंत यांचा गुरांचा गोठा आहे. गोठ्यात एक वासरु व तीन गाभण शेळ्या व एक करडू  होते.

रविवार दि. 18 रोजी नेहमी प्रमाणे महेश यांनी वासरु व शेळ्या रानातून चारुन आणल्या. रात्री जेवण झाल्यावर अकराच्या दरम्यान त्यांना वैरण टाकून महेश घरी झोपायला गेले.सोमवारी सकाळी सहाच्या दरम्यान ते गोठ्याकडे गेले असता भेदरलेल्या अवस्थेतील वासरु व मृत अवस्थेतील शेळ्या दिसून आल्या. त्यांनी वनविभागाला याची कल्पना दिली.घटनेची माहिती मिळताच वनपाल सी. एच. कुंभार ,वनरक्षक आर. ए. कदम, वनसेवक एस. एल. शिंदे व एस.जी. टोळे यांनी घटनास्थळी भेट दिली.ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला.बिबट्याच्या हल्ल्यात तीन गाभण शेळ्या व एक करडू मृत्यूमुखी पडले. यात अंदाजे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

कोकिसरेत बिबट्याचे दर्शन

मोरगिरी भागातील कोकिसरे ( ता. पाटण ) येथे बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक दिवसांपासून कोकिसरे परिसरात बिबट्याचा वावर असून बिबट्या मानवी वस्तीत येऊ लागला आहे. रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोकिसरे येथे एका गल्लीमध्ये ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्या नवलाई देवी मंदिरापासून येऊन मधल्या गल्लीने शिवाराकडे गेल्याचे सांगण्यात आले.

स्थानिक लोकांनी प्रत्यक्ष बिबट्या पाहिल्याने घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याअगोदर बिबट्याने अनेकवेळा कोकीसरेतील ग्रामस्थांना दर्शन दिले होते. सध्या आंब्याचा हंगाम सुरु होत असल्याने आंब्याचा बागेत लोक फवारणीसाठी व राखण करण्यासाठी जात असतात.मात्र बिबट्याचा वावर परिसरात असल्याने ग्रामस्थांनी धास्ती घेतली आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.