Sat, Jul 20, 2019 13:41होमपेज › Satara › मी कुणाला घाबरतही नाही अन् हादरतबी नाही..!

मी कुणाला घाबरतही नाही अन् हादरतबी नाही..!

Published On: Feb 24 2018 11:11AM | Last Updated: Feb 24 2018 10:55AMसातारा : प्रतिनिधी 

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले म्हणजे डॅशींग व्यक्तिमत्व. कधी काय करतील याचा नेम नाही. प्रसंग कितीही बाका असो. राजेंच्या बेडरपणापुढे सारेच फिेके पडतात. याचेही किस्से अनेकदा सांगितले  जातात. सातारकरांनी अनेकदा असे प्रसंग आखों देखा अनुभवलेही आहेत. जुलै 2012 मध्ये वसईचे आ. विवेक पंडित यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे धाडस केले होते. सातार्‍यात  मोर्चा. तोही उदयनराजेंच्या विरोधात. त्यामुळं वातावरण कमालीचं तापलं होतं.

विवेक पंडितांसह मोर्चेकरी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मोर्चात सहभागी  झाले होते. मोर्चा सुरू असताना स्वतः उदयनराजे  कार्यकर्त्यांसह मोर्चात शिरले. ज्यांच्या विरोधात मोर्चा तेच मोर्चात सहभागी झाल्याचं अनोखं दृश्य महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं. पोलिसांच्या समोरच हे घडलं. पोलिस फक्त बघत राहिले. अचानक घडलेल्या या घडामोडीमुळं सगळे कॅमेरे खा. उदयनराजेंकडे वळले. समोर टीव्ही वाहिन्यांचे बूम आणि कॅमेरे आल्यावर गप्प बसतील तर ते उदयनराजे कसले ? आपण अन्याय केल्याचा आरोप खोडून काढताना ते  आपल्या खास शैलीत सांगू लागले, मला आठवतंय काल आज कधी कुणावर अन्याय केला नाही. भविष्यातही करणार नाही. विवेक पंडितांकडं निर्देश करून ते म्हणाले, आमदार साहेब मोठे आहेत. त्यांचा अनुभव जास्त आहे. मी स्वतः बोलायला आलोय तरी ते बोलायला तयार नाहीत. (पंडितांच्या तोंडावर काळी पट्टी बांधलेली होती.) जर खरंच कुणावर अन्याय झाला असेल तर मला शासन झालं पाहिजे.

तुम्ही तुमच्या कारणासाठी लढा. पण आमच्या घराण्यावर घाव घालू नका. कोण म्हणतं उदयनराजे घाबरले, उदयनराजे हादरले. खर सांगू का, मी कुणाला घाबरतही  नाही. हादरतबी नाही. वेदना झाल्या म्हणून  आलो. असे हे उदयनराजे! गर्दीचं तुफान वेड असणारा हा सातारकरांचा लाडका हिरो. संपूर्ण जिल्हा वाढदिवसाच्या माहोलात असताना उदयनराजे मात्र सातारकरांच्या सेवेत गुंतले आहेत. त्यांची ही संवेदनशिलताच त्यांना या शतकातला नायक ठरवत आहे. 


लोकसभेतील पहिलेच भाषण इंग्रजीत

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले हे दोन टर्म खासदार आहेत. ज्याप्रमाणे त्यांची सातार्‍यात लोकप्रियता आहेत तेवढीच लोकप्रियता संसदेतही आहेत. छ. शिवाजी महाराजांचे वंशज आणि त्यांची कार्यपध्दती या  दोन गोष्टीमुळे ते सर्वांना परिचित आहे. खासदार म्हणून उदयनराजे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी लोकसभेत त्यांचं पहिलं भाषण इंग्रजीत केलं, याचं सातारकरांना भयंकर कौतुक वाटलं होतं.

भारावलेल्या सातारकरांनी उदयनराजेंचा लोकसभेत भाषण करतानाचा फोटो संपूर्ण जिल्ह्यात होर्डिगवर लावला. शिवाय, स्थानिक लोकल चॅनल्सने त्याची व्हिडिओ टेप वारंवार दाखवली होती. आपले  महाराज साहेब इंग्रजीत बोलतात यावरच सातार्‍यातली प्रजा खूष आहे.


उदयनराजेंनी कुणाला दाखवला जोधा अकबर!

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले हे सतत वादात राहिलेलं व्यक्तिमत्व. अशी ही सातार्‍याची तर्‍हा नावाचा एक सिनेमा पूर्वी येऊन गेला. तेव्हापासून सातार्‍यातल्या कुठल्याही वेगळ्या गोष्टीला तर्‍हा असंच म्हटलं जातं. तर्‍हा शब्दाला अनेक अर्थछटा आहेत. चांगल्या, वाईट आणि गंमतीदारही. त्याअर्थानं पाहिलं तर खा. श्र. छ.उदयनराजे यांची तर्‍हा काही वेगळीच आहे.  खा. उदयनराजेंच्या संदर्भानं अनेकजण अनेक  किस्से सांगत असतात. सतरा-अठरा वर्षांच्या राजकीय आयुष्यात खा. उदयनराजेंबद्दल अनेक किस्से प्रचलित झाले आहेत. खा. उदयनराजे हे बदलत्या काळाचं, बदलत्या राजकीय संस्कृतीचं प्रॉडक्ट आहे.  बेधडक विधानं, सार्वजनिक ठिकाणी आक्रम कता हा तर त्यांच्या डाव्या हाताचा खेळ आहे. 

राजकारणात येण्याआधी फॉर्म्यूला वन रेसमध्ये भाग घ्यायचं त्यांचं स्वप्नं होतं. त्यातच करिअर करायचं होतं, पण ते काही जमून आलं नाही. सातार्‍यातल्या रस्त्यावरून किंवा सातारा-पुणे हायवेवर वेगवान ड्रायव्हिंग करणारा त्यांचा थरार  काहींनी अनुभवला आहे. एकदा सातारा एसटी स्टँडच्या परिसरात दोन तरुणांना त्यांनी  आपल्या गाडीत घेतलं आणि पुण्याला जोधा अकबर सिनेमा बघायला निघाले. सिनेमा बघितल्यावर  फाइव्ह स्टार हॉटेलात नेऊन त्या मुलांना जेवायला घातलं. आणि परत सातार्‍यात आणून सोडलं.  महाराजांच्या पाहुणचाराचं ठीक पण त्यांच्या गाडीत बसल्यामुळं त्या पोरांची पाचावर धारण बसली असेल ऐवढं मात्र नक्की.